राज्यसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षाचे आमदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले हे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.
त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला असून आगामी राज्यसभा निवडणुकीत आपण शिवसेनेला मतदान करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. येत्या काही वेळात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संख्याबळात आणखी एका आमदाराची भर पडली आहे. सध्याच्या घडीला अपक्ष आमदार आणि इतर छोट्या पक्षाच्या आमदारांची मतं भाजपा आणि महाविकास आघाडीला अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
पालघरमधील डहाणू मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या निकोले यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. निकोले हे सर्वात गरीब आमदार आहेत. निकोले यांची एकूण संपत्ती ५१ हजार ८२ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे निकोलेंच्या नावावर स्वत:चे घरही नाही. ते डहाणूमधील वाकी येथे भाड्याच्या घरामध्ये राहतात.
त्यांची पत्नी बबिता या आश्रम शाळेमध्ये सेविका म्हणून काम करतात. त्यांचे महिन्याचे वेतन सहा हजार रुपये आहे. निकोले यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याकडे ३० हजार २४० रुपयांची रोख रक्कम असल्याचे म्हटले होतं. तर पत्नीकडे पाच हजारांची रोख रक्कम असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं.