मासे मिळत नसल्याने स्थानिक मच्छीमारांवर संकट
पालघर : पालघर जिल्ह्याच्या समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करीत असलेल्या क्षेत्रामध्ये बेकायदा पर्ससीनधारक नौकांचा उच्छाद कायम आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या मते या उष्ण कटिबद्ध काळात समुद्रात सुरमई, घोळ, दाढा, रावस तर काही प्रमाणात सरंगे, बोंबील, कोळंबी, मांदेली आदी मत्स्यसाठे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पर्ससीन धारकांच्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळत नसल्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे. शासनाने एलईडी व पर्ससीन नौकांवर राज्य हद्दीतील मासेमारी क्षेत्रात बंदी घातली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून ही मासेमारी केली जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे समुद्री क्षेत्रात लक्ष नसल्याने त्याचा फायदा पर्ससीनधारक घेत असून येथील मत्स्यसंपदा नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे, असे आरोप होत आहेत.
पर्ससीन नौका समुद्रात असल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर गस्ती नौका पाठविल्या गेल्या. मात्र तेथे तसे काहीच दिसले नाही. तरीही यापुढे मत्स्यव्यवसाय विभाग समुद्री क्षेत्रात गस्ती घालून पाळत ठेवत आहे. बेकायदा नौका आढळल्यास कारवाई केली जाईल. – आनंद पालव, सहमत्स्यव्यवसाय आयुक्त, ठाणे व पालघर
पर्ससीन नौकाधारक घुसखोरी करून या क्षेत्रातील मत्स्यसंपदा नष्ट करण्याचा घाट घालत आहेत. यामुळे येथील मच्छीमार नेस्तनाबूत होणार आहे, अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. – जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ
पर्ससीनधारक घुसखोरी करून येथील मच्छीमारांच्या हातचा व्यवसाय पळवत आहेत. मत्स्यव्यवसाय विभाग याकडे कानाडोळा करून पारंपरिक मच्छीमारांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत. – ज्योती मेहेर, सचिव, नॅशनल फिश वर्कर्स फोरम