प्रशासनाच्या नियोजनाअभावी शेतकरी आठ तास रांगेत ताटकळत
वाडा: वाडा तालुक्यात वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानित वाटप करण्यात येणाऱ्या बियाण्यासाठी येथील प्रशासनाचे नियोजन नसल्याने भात बियाणे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर सात ते आठ तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.
एक जूनपासून वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून या ५० टक्के अनुदानित भात बियाणेचे वाटप करण्यास सुरुवात झाली. मात्र या बियाणाचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात पदाधिकारी व येथील पंचायत समितीचे प्रशासन अपयशी ठरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला. तालुक्यात एकूण १८,५०० हेक्टर खरीप क्षेत्र आहे. यामधील दोनशे हेक्टर क्षेत्रावर तूर, उडीद, नाचणीचे पीक घेतले जाते. उर्वरित क्षेत्रावर भातपिक घेतले जाते. शेतकऱ्यांसाठी जवळपास २५०० क्विंटल भात बियाणाची आवश्यकता असताना फक्त ५५० क्विंटलची मागणी वाडा कृषी विभागाने केली होती. केलेल्या मागणीमधील ४३९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. हे बियाणे तालुक्यातील फक्त २५ टक्के शेतकऱ्यांना मिळाले. आजही तालुक्यातील ७५ टक्के शेतकरी शासनाच्या ५० टक्के अनुदानाने मिळणाऱ्या भात बियाणांपासून वंचित राहिले आहेत.
बांधावरचे बियाणे तालुका मुख्यालयी
शेतकऱ्यांना बियाणे, खते शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून दिली जातील, अशी घोषणा शासनाने केली होती. मात्र बांधावर तर नाहीच, पण गावात अथवा विभागातही बियाणे उपलब्ध झाली नाहीत. ही बियाणे मिळविण्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना ३० ते ४० किलोमीटर अंतरावरून तालुका मुख्यालयी यावे लागले. ग्रामसेवकांची मदत घेऊन तालुक्यातील आठ ते दहा विभागात बियाणे वाटप केले असते तर गर्दीही टळली असती व शेतकऱ्यांना सोयीचे झाले असते.
भात बियाणासाठी सात ते आठ तास भर उन्हात रांगेत उभे राहण्याची आम्हा शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेली ही एक शिक्षाच आहे.
-रामचंद्र पटारे, शेतकरी, रा. मोज, ता. वाडा.
भात बियाणाचे विभाग निहाय वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. तसेच अर्थिक व्यवहारात गफळत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-अशोक सोनटक्के गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाडा.