अंतर नियमांचा फज्जा; प्रशासनाचे दुर्लक्ष
कासा : निर्बंध शिथिल होताच विक्रमगड तालुक्यासाठी असलेल्या मुख्य बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु अंतर नियमांचा येथे फज्जा उडाला असून अनेक ग्राहक मुखपट्टय़ाविना येथे बाजारहाट करताना दिसत आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विक्रमगड तालुक्यातील ३० ते ३५ गावांसाठी विक्रमगड हीच मुख्य बाजारपेठ आहे. शेतकरी वर्ग, तसेच शेती कामावर मोलमजुरी करणारे नागरिक शेती साहित्य, किराणा माल खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विक्रमगडच्या बाजारपेठेवर अवलंबून असतात. १ जूनपासून निर्बंध शिथिल होताच बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांश ग्राहक कोविडचे नियम पाळताना दिसून येत नाहीत. अंतर नियम, मुखपट्टी तसेच सॅनिटायझरचा वापर याबाबतच्या नियमांचा फज्जा उडालेला आहे. मुखपट्टीचा वापर जरी होत असला तरी ही मुखपट्टी अनेकांच्या हनुवटीखाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नियमाचे पालन न केल्यास दोन हजार रुपये तर मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. दुकानात गर्दी झाली तर दोन हजार रुपये दंड आहे, तर वारंवार दुकानात गर्दी झाल्यास दुकान सील केले जाईल.
– श्रीधर गाल्लीपिल्ली, तहसीलदार, विक्रमगड