महालक्ष्मी मंदिराजवळील जंगलात अज्ञात चोरट्यांचे कृत्य

कासा :  शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर परिसरातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जंगलात मौल्यवान अशा ३५ ते ४० वर्षे जुन्या दोन सागवान जातीच्या झाडांची चोरीच्या उद्देशाने अज्ञात इसमांनी कत्तल केली.

पालघर जिल्हा हा वनविविधतेने संपन्न असा जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वन विभागाची जंगले आहेत. या जंगलांमध्ये सागवान, सिसम असे फर्निचर बनवण्यासाठी लागणारे लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु वनविभागाच्या डोळ्यात धूळ फेकून बऱ्याचदा रात्रीच्या वेळी या जंगलामधून लाकूड चोरी होत राहते. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अशाच पद्धतीने अज्ञात इसमांनी महालक्ष्मी मंदिर परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जंगलातील ३५ ते ४० वर्षे जुनी दोन सागवानाची झाडे यांत्रिक करवतीच्या साहाय्याने कापली. महामार्गावरून रात्रीची गस्त घालत असताना पोलिसांना महामार्गाच्या बाजूच्या जंगलात संशयास्पद हालचाली होत असल्याचे जाणवले. त्यामुळे पोलीस थांबले व जंगलाच्या दिशेने जायला लागले ते पाहून चोरांनी पळ काढला. कापलेल्या दोन झाडांचे बाजारमूल्य एक ते सव्वा लाखांच्या आसपास आहे. वन विभागाच्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यात अज्ञान इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader