डहाणू : अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय वादळामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. वादळी वाऱ्यांची तीव्रता ताशी ४५ ते ५० किमी असल्यामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यासह इतर भागांत चिकू आणि आंबा बागायतदारांना मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
चिकू फळाचा पावसाळय़ात हंगाम तयार होण्याच्या स्थितीत असलेली फळे गळून पडली आहेत. गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलांमुळे तसेच येणाऱ्या चक्रीवादळामुळे चिकू उत्पादनावर परिणाम झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून चिकू विम्याचा भरणा तीन हजारांवरून अठरा हजार इतका वाढवल्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली असून वातावरणातील बदल आणि बिपरजॉयसारख्या वादळी संकटांमुळे बागायतीच्या होणाऱ्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे डहाणूतील चिकू उत्पादनवाढीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केवळ आश्वाासन तोडगा नाहीच
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलामुळे चिकू उत्पादकांचे सातत्याने नुकसान होत आहे. चिकू विमाबाबतीत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्यावर तोडगा मिळालेला नाही. ऐन हंगामामध्ये उत्पादनावर परिणाम होत असल्याने डहाणू तालुक्यातील बागायतदार मेटाकुटीला आला आहे.