कासा : डहाणू-जव्हार रस्त्याची खड्ड्य़ांमुळे चाळण झाली आहे. अवघ्या ६० किमीच्या प्रवासासाठी तब्बल दोन ते तीन तासांचा अवधी लागत आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालकांसह प्रवासीही त्रस्त असून   रस्त्याने चालणे देखील मुश्कील झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे काही वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्याला, तो झाल्यापासून काही महिन्यांतच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर केवळ खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर शंका येत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

काही भागात रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र जोरदार पावसामुळे ही डागडुजी खड्ड्य़ात गेली आहे. बांधकाम विभागाचे मलमपट्टी वाहनधारक व प्रवाशांना जीवघेणी ठरत आहे. हा रस्ता अतिशय खराब झाला आहे.

प्रवाशांना रस्त्यातून मार्ग काढणे जिकिरीचे बनते, काही वेळा दुचाकीचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. रस्त्याने अवजड वाहने मोठय़ा प्रमाणात ये -जा करत असतात, पण खड्डय़ामुळे कित्येक अवजड वाहनांचे या रस्त्याने जात असताना अपघात घडत असतात. वाहन बिघडण्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे, त्यामुळे त्यांचात संताप आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या बाबतीत डहाणू व जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.