डहाणू नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यासाठी गेलेल्या एका नगरपरिषद कर्मचाऱ्याला जाहिरात फलक काढण्यास विरोध करत एका संघटनेच्या कार्यकर्त्याने मारहाण केली, असा आरोप करत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी उचलून धरली आहे. आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी घेऊन नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले असून कारवाई होईपर्यंत कर्मचारी संपावर जाण्याचा संकेत दिले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डहाणू नगरपरिषदमार्फत शहरातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवार १५ डिसेंबर रोजी शहरातील रेल्वेस्थानक परिसरात जाहिरात फलक काढत असताना एका संघटनेचा कार्यकर्ता आणि नगरपरिषद कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होऊन संघटनेच्या कार्यकर्त्याने नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याविषयी डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दखल होऊनदेखील आरोपीला अटक झाली नसल्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले असून आरोपीला अटक होईपर्यंत नगरपरिषद कर्मचारी संप करणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – पालघर : कंक्राडी राईपाडा येथील एका वाडीत मादी बिबट्याचा अधिवास, बिबट्यासह दोन पिल्ले आढळली

याविषयी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून जाहिरात फलक काढताना एका महापुरुषाचे छायाचित्र असलेले फलक काढताना महापुरुषाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना फलक व्यवस्थितरित्या काढण्याची सूचना दिली असता वाद निर्माण झाला. मात्र मी कोणत्याही कर्मचाऱ्याला शिवीगाळ अथवा मारहाण केली नाही अशी माहिती संघटनेच्या कर्मचाऱ्याने दिली आहे.

डहाणू रेल्वेस्थानक परिसरात महापुरुषाचा फोटो असलेल्या फलकावर तीन फलक लावण्यात आले होते. आम्ही तीन फलक काढल्यानंतर महापुरुषाचा फोटो असलेला फलक समोर आला. मात्र हा फलक आधीपासून फाटलेल्या अवस्थेत असून आम्ही व्यवस्थितरित्या फलक उतरवत होतो. दरम्यान एका संघटनेच्या कार्यकर्त्याने त्याठिकाणी आमच्याशी वाद घालत मला मारहाण केली आहे. – वैभव येगडे, शहर अभियान व्यवस्थापक, डहाणू नगरपरिषद

हेही वाचा – तानसा अभयारण्याच्या लगत प्रदूषणकारी उद्योग

डहाणू नगरपरिषद हद्दीतील घटनेचे पडसाद जिल्हाभरात उमटत असून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनामार्फत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. डहाणूसह तलासरी, विक्रमगड, जव्हार नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी याविषयी वरिष्ठ स्तरावर निवेदने दिली असून पालघर पोलीस अधीक्षक, पालघर जिल्हाधिकारी यांनादेखील निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी घेऊन नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सोमवार १८ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahanu municipal council employee beaten up a case has been registered against a person employees protest demanding arrest ssb