करारनाम्याचे नूतनीकरण नाही, एक कोटीची थकबाकी
पालघर: डहाणू नगर परिषद कार्यालय रेल्वे स्थानकाजवळील भागात मार्च २०१४ पासून कार्यरत आहेत. मात्र जागेच्या वापराचा मोबदला जागा मालकाला जुलै २०१६ पासून देण्यात आलेला नाही. त्यानुसार परवाना शुल्कापोटी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी झालेली आहे. या कार्यालयाचा डहाणू नगरपालिकेकडून अनधिकृत वापर होत असल्याची तक्रार जागा मालकांनी केली असून आपली थकबाकी रक्कम अदा करून जागा मोकळी करण्याची नोटीस नगर परिषदेला बजावली आहे.
डहाणू रेल्वे स्थानकाजवळील मल्याण भागात ‘कुमार कॉर्नर’ नावाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ३४९८ चौरस फुटांचे क्षेत्रफळ असलेल्या वाणिज्य जागेत डहाणू नगर परिषद कार्यालयासाठी परवाना तत्त्वावर वापर करण्यासाठी ११ मार्च २०१४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात ‘लिव्ह अँड लायसन्स’ तत्त्वावर नोंदणी करण्यात आली होती. १ फेब्रुवारी २०१४ ते ३१ जानेवारी २०१७ या ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी करारनाम्यात ठरलेल्या ८० हजार ४५४ रुपयांचा परवाना शुल्क मान्य करण्यात आले होते. करारानुसार दर सहा महिन्याची परवाना शुल्क नगर परिषदेने आगाऊ देण्याचे मान्य केले असले तरी ३१ जुलै २०१६ पर्यंतचे परवाना शुल्क जागामालकांना देण्यात आले आहे. त्यापासून ३१ जानेवारी २०१७ या कराराच्या उर्वरित कालावधीतील परवाना शुल्क देण्यात आला नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय करारनामा संपुष्टात आल्यानंतर पूर्वीच्या करारात ठरल्याप्रमाणे १५ टक्के परवाना शुल्कात वाढ करू देण्याचे ठरले असताना नगरपरिषदेने त्याला बगल देऊन परवाना नूतनीकरण केल्याशिवाय नगर परिषदेने या जागेचा अनधिकृत वापर केल्याचे जागा मालकाने आरोप केले आहेत.
पूर्वीच्या करारनामा काळातील थकबाकी व सध्या वापरात असलेल्या जागेची वाढीव परवाना शुल्क पाहता किमान एक कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे जागा मालकाचे म्हणणे असून यासंदर्भात नगर परिषदेला बजावलेल्या नोटीसीला नगरपरिषदेने आजतागायत उत्तर दिले नाही. त्याचप्रमाणे याबाबत पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आली असून थकबाकी रक्कम अदा करून जागेचा ताबा परत मिळावा अशी मागणी जागा मालकांनी केली आहे. याविषयी डहाणूचे मुख्य अधिकारी वैभव आवारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी मार्ग काढावा अशी विनंती जागा मालकांतर्फे करण्यात आली आहे.
राजकीय वादाचा जागामालकांना फटका
डहाणू नगर परिषदेच्या पूर्वीच्या कौन्सिलने जागा मालकासोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व परवाना शुल्क हा बाजारभावापेक्षा अधिक असल्याचे कारण सांगून नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीला मंजूर नसल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. खाजगी जागेचा नगर परिषदेच्या कार्यालयासाठी वापर होताना सुधारित करारनामा करणे अपेक्षित होते. मात्र नगर परिषदेने नियमांना धुडकावून जागेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. तांत्रिकदृष्टय़ा नगरपालिका कार्यालय अनधिकृत जागेत कार्यरत असताना शहरांमध्ये असणाऱ्या इतर अनधिकृत बांधकामांविरुद्ध नैतिकदृष्टय़ा कशा प्रकारे कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.