डहाणू-वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान २८ फेब्रुवारीपर्यंत मेगाब्लॉक
पालघर: पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९.५५ ते १०.५५ दरम्यान अचानक घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे लाखो रेल्वे प्रवाशांसह नोकरदारांचे हाल झाले. पूर्वकल्पना न देता हा अघोषित मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला गेला. २८ फेब्रुवारीपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी दररोज एका तासाचा ब्लॉक असणार आहे.
डहाणू वाणगावदरम्यान रेल्वे रूळलगत सुरू असलेल्या समर्पित मालवाहू प्रकल्प व रेल्वेच्या उच्च दाबाच्या विद्याुत तारा दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक ठेवण्यात आलेला आहे. बुधवारी ऐन कामाच्या दिवशी व गर्दीच्या वेळेत ब्लॉक झाल्यामुळे रेल्वेसेवा एक तास बंद होती व डहाणू ते विरार अप डाऊन गाडय़ा यावेळेस बंद होत्या. पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध न झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांना मात्र जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लाखो प्रवासी विरार आणि डहाणू दरम्यानच्या रेल्वे सेवेवर अवलंबून असतात. बुधवारी विरार ते डहाणू दरम्यान फक्त एक सूचना फलक लावण्यात आला होता. पूर्वकल्पना नसल्याने प्रवाशी गोंधळात पडले. आता २८ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १०.१० ते ११.१० या वेळेत एक तास दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. या वेळेत धावणाऱ्या विरार ते डहाणू व डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द केल्या आहेत.
एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवाशांना लाभ
सकाळची गर्दी कमी करण्यासाठी कर्णावती एक्स्प्रेसला पालघर आणि विरार, अजमेर दादर सुपर फास्ट एक्स्प्रेसला बोरिवली आणि विरार, बांद्रा वापी पॅसेंजरला उमरोली येथे थांबा, गांधीधाम वांद्रे एक्स्प्रेसला पालघर आणि विरार येथे थांबा दिला आहे. जेणेकरून प्रवाशांना प्रवास करता येईल. मेगाब्लॉकच्या वेळेत चर्चगेट-विरार आणि डहाणू रोड-विरार लोकल केळवेपर्यंत धावतील व वरील मेल एक्सप्रेस गाडय़ांचा लाभ प्रवासी वर्गाला घेता येईल असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.