पावसाचा १० हजार शेतकऱ्यांना फटका, सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
पालघर : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या मोसमी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील सुमारे ३१३८ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी संयुक्त सर्वेक्षण सुरू असून दसऱ्यापूर्वी ते पूर्ण होईल, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तयार होत आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्या संदर्भात महसूल, जिल्हा परिषद तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत गावोगावी नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. जव्हार व मोखाडा या दोन तालुक्यांच्या व्यतिरिक्त ६८४ गावांमधील १० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल या आठवडाअखेरीस प्राप्त होईल, अशी शक्यता आहे, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात लागवड केली जात आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज पाहता पालघर व डहाणू या दोन तालुक्यांतील भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ५३ हजार शेतकरी शासनाच्या ई-पीक योजनेअंतर्गत झालेल्या शेतीचे तपशील थेट कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करीत आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतल्याने दसरा-दिवाळीचा सण साजरा करण्याची अपेक्षा जणू धुळीस मिळाली आहे. भात, पावली व गवत यामधून शेतकरी व शेतमजूर यांना मोठी रोजगाराची संधी मिळत असते, मात्र या वर्षी पावली गेले आणि गवतही जाण्याच्या बेतात असल्याने राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.