दुर्घटनाग्रस्त तराफ्यातून इंधन काढण्याच्या कामाला सुरुवात

पालघर : पालघर तालुक्यातील वडराई समुद्रकिनाऱ्यासमोर लागलेल्या तेल व नैसर्गिक वायू मंडळाच्या सेवेत असलेल्या एका महाकाय तराफ्यातून इंधन गळती होत असल्याने समुद्र प्रदूषित होण्याची भीती व्यक्त होत होती. त्याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलून संबंधित तराफा कंपनीला इंधन रिकामे करण्यास सांगितले असता त्यानुसार विविध पातळ्यांवर विविध यंत्रणांमार्फत तराफ्यामधून इंधन काढायला सुरुवात केली आहे.

इंधन गळती झाल्यानंतर ते समुद्रात इतरत्र पसरून प्रदूषण होऊ नये यासाठी तराफा उभा असलेल्या ठिकाणी चारही बाजूने तरंगते सुरक्षा वलय बसवण्यात आले आहे. तराफामध्ये सुमारे ८० हजार लिटर इंधन काढण्यासाठी लहान-लहान टाक्या आणल्या असून त्याद्वारे हे इंधन रिकामे केले जात आहे. या टाक्या स्थानिक मच्छीमार बोटींच्या साहाय्याने किनाऱ्यावर भरून आणून ठेवले जात आहे. त्यामुळे आता समुद्रात इंधन प्रदूषण होण्याची भीती दूर झाली आहे. तटरक्षक दल या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गेल कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा तराफा आहे. इफकॉन कंपनीने तो भाडेकराराने घेतला आहे. या कंपनीचे प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे प्रतिनिधी, मरिन र्मचड शिपिंगचे कॅप्टन मीना यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन इंधन बाहेर कसे काढता येईल यासाठी तांत्रिक पाहणी केली. त्यानंतर सुचविलेल्या उपाययोजनानुसार हे इंधन बाहेर काढण्याचा हालचालींना जोर धरला. आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात इंधन उपसा करून ते किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader