मस्तान नाका, चिल्हार फाटा, चारोटी मार्ग खड्डेमय; प्रशासन व टोल कंपनीकडून दुर्लक्ष

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका, चिल्हार फाटा, चारोटी येथील महामार्गावरील सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र या खड्डय़ाकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल आकारणारी संबंधित कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी या सेवा रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करताना स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता केला आहे. मात्र सध्या या सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मस्तान नाका येथील सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत या खड्डय़ात पावसाचे पाणी साचते, परिणामी या खड्डय़ात वाहने आदळून अपघात होत आहेत.

काही दिवसांपूर्वी चारोटी महामार्गाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करून दुरुस्ती केली आहे. मात्र हे काम करताना संबंधित प्रशासनाने सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे स्थानिक नागरीकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धोका पत्करावा लागत आहे.

खानीवडा टोलनाका ते चारोटी टोलनाका कडे जाणारा दोन्ही बाजूंवरील सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे सेवा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही गावांमध्ये सेवा रस्त्याचे काम अपुरे आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे केली नाहीत, याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व टोलनाका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे.

रात्रीच्या वेळी प्रवास जीवघेणा

टोलनाका प्रशासन महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल आकारते, या पैशातून सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने डांबरीकरण करून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. रात्रीच्या सुमारास हा प्रवास अधिक धोक्याचा ठरत आहे. वेगातील वाहनाला अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने महामार्गावरील वाहन व सेवा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाची धडक होण्याची शक्यता वाढली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous highway service road ssh
Show comments