पालघर : पालघरचा वाघोबा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे. घाटरस्त्याच्या कपारी ढासळल्याने रस्ता खचत आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी बसवलेले लोखंडी संरक्षण कठडे तुटून पडले आहेत. गवत-झुडपे वाढल्याने खचलेल्या रस्त्याचा खड्डा दिसेनासा झाल्याने अपघाताची शक्यता आहे.
पालघर-मनोर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० अ म्हणून घोषित करण्यात आला आहे. पूर्वी या रस्त्याची देखभाल- दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होती. मात्र, आता तो महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याने त्याच्या देखभाल- दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. घाटात पालघरकडे येणाऱ्या उताराच्या वळणाकडचा रस्ता पूर्णपणे खचला. पावसाळी हंगामामध्ये पावसाचे पाणी डोंगर-कपाऱ्यांवरून रस्त्याच्या साइड पट्टीने वाहत असल्याने या प्रवाहामुळे रस्त्याच्या बाजूकडील माती धुऊन निघाली आहे. काही ठिकाणी लोखंडी संरक्षण कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास वाहन थेट खचलेल्या भागात जाण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्हा मुख्यालय झाल्यापासून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठी आहे. कामाच्या दिवशी अनेक जण मुख्यालयाकडे या रस्त्याने ये-जा करीत आहेत. त्यातच या वाघोबा घाटामध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने साइड पट्टी खचलेली दिसून येत आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक वेळा अवजड वाहने जाताना वाहतूक कोंडी होत आहे. ही अवजड वाहनांना मागे टाकत असताना अपघाताची दाट शक्यता आहे. साइड पट्टीत वाहन गेल्यास वाहन अडकून पडण्याची शक्यता आहे. रस्त्याची प्राधिकरणाकडून पाहणी पावसाळय़ात वाघोबा घाटात नैसर्गिक नाले व धबधबे मोठय़ा प्रमाणात प्रवाहित होत असतात. पाण्याच्या या प्रवाहांमुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या साइड पट्टीला नाल्याचे स्वरूप येते. पाणी निचरा होण्याची व्यवस्था या घाटामध्ये नसल्यामुळे रस्त्यांच्या साइडपट्टी खचतात. रस्त्यालगतची साइड पट्टी माती वाहून गेल्याने रस्ते खचू लागले आहेत. अवजड वाहने जाताना या रस्त्यांवर अपघात होऊ शकतात. दरम्यान, धोकादायक रस्त्याची पाहणी करण्यात आली असून त्याच्या दुरुस्तीची सूचना ठेकेदाराला देण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे.
तक्रार कुणाकडे करायची?
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला असला तरी त्याचे कामकाज पाहणारे कार्यालय व अधिकारी- कर्मचारी वसई तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळे रस्त्याशी निगडित तक्रारी करण्यासाठी नागरिकांना गैरसोय होत आहे. मनोर येथे हे कार्यालय स्थापन करण्यासाठी जागा देण्यात आली असली तरीही अजूनपर्यंत हे कार्यालय येथे स्थलांतरित झालेले नाही.