रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे पालघरमध्ये नवजात बालकाचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्चून ३० ते ३५ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. परंतु त्यामार्फत रुग्णसेवा वेळीच मिळत नसल्यामुळे या रुग्णवाहिका शोभेच्या वस्तू ठरू लागल्या आहेत. त्याचा प्रत्यय देणारी घटना पालघर तालुक्यात पुंजारपाडा येथे गुरुवारी घडली. येथील एका गर्भवती महिलेला आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी जाण्यासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांमध्ये संताप खदखदत आहे. 

करोना पार्श्वभूमीवर आमदार निधी व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ३०-३५ नव्या रुग्णवाहिका आल्या असून त्यांचा वापर सुरू झाला आहे. मात्र १०८ प्रणालीमधील रुग्णवाहिकांची सेवा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध रुग्णवाहिकामधील समन्वय नसल्याने रुग्णांना या सेवेचा लाभ योग्य वेळी मिळत नसल्याचे पुंजारपाडा येथील घटनेतून दिसून येत आहे. पुंजापाडा येथून किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सोमाटा येथे आरोग्य केंद्र आहे. असे असतानाही वेळीच रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. याबाबत १०८ प्रणालीमधील    रुग्णवाहिका समन्वयकाशी संपर्क साधला असता सोमटा येथील महिलेला प्रसूतीसाठी नेमण्यासाठी विक्रमगड येथील रुग्णवाहिकेला वर्दी मिळाली होती. मात्र स्थानिक आशा सेविकेशी संपर्क साधला असता प्रसूती झाल्याचे सांगण्यात आल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचली नसल्याचे कारण देण्यात आले. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रुग्णवाहिका उभी होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते, असे असताना तर मग ती वेळीच का आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ समन्वय नसणे आणि  बेजबाबदारपणा या कारणामुळे नवजात बालकाला मृत्यूला सामोरे जावे लागले, हाच प्रकार यातून दिसून आल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या अशा कारभारावर रोष व्यक्त केला आहे.

मुळातच प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागांमधील  प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या महिलाचा तपशील बाळगणे व त्यांच्याकडे लक्ष ठेवणे ही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची व त्यांच्यासोबत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याची जबाबदारी असते.  असे असताना आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पालघर तालुक्यात घडली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान,  या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुका संघटक दिनेश पवार यांनी दिला आहे.

रुग्णवाहिका नसल्यामुळे डोलीतून प्रवास

सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुमारे एक किलो मीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या पुंजारपाडा येथील  सावित्री सुदाम सवले (४०) या महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. तिच्या नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून गुरुवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला गेला. मात्र अर्धा-पाऊण तास झाल्यानंतर देखील रुग्णवाहिका आली नाही. तसेच त्यांच्याकडून कोणतीही सूचना प्राप्त झाली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी वेळ न दडवता डोलीच्या माध्यमातून त्या महिलेला सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेण्यास सुरुवात केली.  या महिलेची पाचव्या खेपेची प्रसूती होती. परंतु तिचा प्रवास सुरू असतानाच रस्त्यातच तिची प्रसूती झाली. त्यावेळी आशासेविका किंवा आरोग्य विभागाचे मदतनीस उपस्थित नव्हते. प्रसूतीनंतर काही वेळातच नवजात बाळ दगावले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

Story img Loader