पालघरच्या खासदारांना सफाळा ग्रामस्थांनी दिले तक्रारीबाबतचे निवेदन
पालघर : समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर सुरू करण्यासाठी सफाळे रेल्वे फाटक बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला तीव्र विरोध उफळून आला असून सफाळे रेल्वे फाटक बंद करण्याबाबतचा अंतिम निर्णय विभागीय रेल्वे प्रवासी वापरकर्ते सल्लागार समिती अर्थात झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टिटेटिव्ह कमिटीच्या हाती जाणार आहे. रेल्वे फाटक बंद केल्याने गैरसोय होणाऱ्या सफाळे परिसरातील नागरिक व बाधित होणाऱ्या घटकांनी आज खासदारांना निवेदन दिले.
समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने ३१ मार्चच्या मध्यरात्रीनंतर सफाळे येथील रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. अचानक बंद करण्यात आलेल्या या रेल्वे फाटकामुळे पूर्व – पश्चिम जोडणी (कनेक्टिव्हिटी) बंद झाली होती. या विरोधात बाधित झालेल्या घटकांनी शुक्रवारी (ता ४) आंदोलन पुकारले होते.
रेल्वे फाटक बंद झाल्याने भाजी विक्रेते, मासे विक्रेते, दूध व्यावसायिकांना मुंबईच्या दिशेने प्रवास करताना सामान उचलून अस्तित्वात असणारा पादचारी पुल ओलांडणे आवश्यक झाले होते. त्याचबरोबर वृद्ध व महिला प्रवाशांना देखील पूर्व पश्चिम भाग ओलांडून जाण्यासाठी वळसा घालून जाणे आवश्यक असल्याने त्रासदायक ठरत होते. सफाळ्याची बाजारपेठ, भाजी मार्केट, मासळी मार्केट पूर्वेच्या भागात असल्याने पश्चिमेच्या नागरिकांना बाजारपेठेत येणे गैरसोयीचे ठरत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांच्या प्रतिनिधींनी आज खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सोबत झालेल्या संवादादरम्यान निवेदन दिली.
खासदार डॉ. सवरा यांनी नागरिकांनी केलेल्या तक्रारी समजून घेण्यासाठी प्रत्यक्षपणे घटनास्थळी जाऊन संबंधित घटकांशी चर्चा केली. त्यांच्याकडून यादृष्टीने पर्याय मागितले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांबाबत तसेच सुचवलेल्या विविध उपाययोजना संदर्भात आपण पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करू असे प्रवाशांची बोलताना सांगितले. यामुळे समर्पित रेल्वे मालवाहू मार्ग सुरू करण्याबाबत अनिश्चितता कायम असून याबाबत झेडआरयुसीसी बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान सफाळे येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी येऊन नागरिकांचे म्हणणे समजून घेतले होते. यासंदर्भात उद्या (सोमवारी) जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व डीएफसीसी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.
नागरिकांनी सुचवलेले उपाय कोणते?
सफाळे रेल्वे स्थानकाच्या बाजूला सबवे ची उभारणी व्हावी, अस्तित्वात असणाऱ्या पादचारी पुलाला पश्चिमेच्या बाजूला तातडीने विस्तार करून दोन्ही बाजूने व प्रत्येक फलाटावर त्याला सरकता जीना (एस्क्युलेटर) व उद्धवाहक (एलिव्हेटर) तातडीने उभारण्यात यावे, रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला (फाटकाच्या बाजूला) नव्याने पादचारी पूल उभारून त्याला सरकते जिने व उद्धवाहक बसवण्याची व्यवस्था करावी याबाबत नागरिकांनी प्रामुख्याने मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.
डीएफसीसी चा पालघर जिल्ह्यातील प्रवास अनिश्चित
समर्पित रेल्वे मालवाहू मार्ग ६ एप्रिल नंतर सुरू करण्याचे डीएफसीसी ने जवळपास निश्चित केले होते. त्यासंदर्भात सावधगिरी दर्शवण्यासाठी सूचना त्यांनी जारी केल्या होत्या. मात्र सफाळा भागात नागरिकांनी रेल्वे फाटक बंद करण्याला तीव्र विरोध दर्शविल्याने तसेच येथील प्रवासी व नागरिक आंदोलन करतील या भीतीपोटी समर्पित रेल्वे मालवाहू मार्गाचा पालघर जिल्ह्यातील प्रवास काही काळ पुन्हा लांबल्याचे दिसून आले आहे.
हा मार्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे योजिण्यात आले होते. मात्र पालघर व सफाळे येथील रेल्वे फाटक बंद करताना पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने या भागातील काम रेंगाळले होते. सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला उभारण्यात आलेल्या निसर्गवासी काळूरामकाका धोदडे उड्डाणपुलाची उभारणी घाई गडबडीत करून त्याचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आला होता.
हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर नागरिकांचा रोष मावळेल अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र रेल्वे फाटकासाठी येथील प्रवासी अडून राहिल्याने समर्पित रेल्वे मार्गावरून मालगाड्यांचा प्रवास लांबणीवर पडला आहे.
सफाळे रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे असणारे रेल्वे फाटक बंद केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. भुयारी मार्ग अर्थात सबवे उभारण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेचा आराखडा व व्यवहार्यता अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा मुद्दा आपण आगामी काळात होणाऱ्या झेडआरयुसीसी च्या बैठकीत उपस्थित करणार आहोत. – डॉ. हेमंत सवरा, खासदार