पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग अर्थात डेडिकेटेड फेड कॉरिडोर (डीएफसी) गुजरात राज्यातील न्यू उंबरगाव (संजाण) पासून सफाळे पर्यंत मालगाड्या धावण्यासाठी सर्व आवश्यक कामे तसेच डीएफसी चे पश्चिम रेल्वे शी जोडणी संदर्भातील काम काल रात्री पूर्ण झाली असून सफाळे पासून दिल्लीपर्यंत या मार्गावरून थेट मालगाडी धावण्याचा मार्ग सज्ज झाला आहे. या मार्गावरून पुढील काही दिवसात मालगाड्या धावू लागणार असल्याने गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी समर्पित मालवाहू मार्गातील पालघर जिल्ह्यातील टप्पा कार्यान्वित करण्यासाठी सज्जता होती. मात्र या मार्गाचे उद्घाटन होऊ न शकल्याने विधानसभा निवडणुकीनंतर मालवाहू मार्ग कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारीच्या मध्यावर हा मार्ग मालगाड्या वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू होती. मात्र सफाळे व नवली (पालघर) येथील रेल्वे फाटक बंद करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने फाटक बंद करण्यास विलंब झाला होता.
३१ मार्च च्या मध्यरात्री सफाळे येथील तर १० एप्रिल च्या मध्यरात्री नंतर नवली येथील फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती. त्यानंतर काल (ता ११) मध्यरात्रीपासून पश्चिम रेल्वेवर सुमारे सहा तासाचा विशेष ब्लॉक घेऊन सफाळे स्टेशनच्या दक्षिणेला काही अंतरावर समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाची जोडणी अस्तित्वात असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या रुळांसोबत करण्यात आली. तसेच याच ब्लॉक दरम्यान नवली फाटतात उड्डाणपूल उभारण्याच्या दृष्टीने धनुष्याच्या आकाराचा (बो- स्ट्रिंग) लोखंडी गर्डर हा डीएफसी व पश्चिम रेल्वेच्या रुळांच्या वरती प्रस्थापित करण्यात आला. त्यामुळे डीएफसी मार्गावर मालगाड्या वाहतूक सुरू करण्यासाठी असणारे अडथळे दूर करण्यात आले. हा रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर व्यवस्थापनाने नागरिकांचे आभार मानले आहेत.
सिग्नल यंत्रणा होणार कार्यान्वित
रेल्वे रुळांची जोडणी पूर्ण झाल्याने डीएफसी मार्गावरून पश्चिम रेल्वे कडे मालगाड्यांची वाहतूक होण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असून ते काही तासात पूर्ण होईल असे डीएफसी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात माल गाड्यांची वर्दळ या मार्गावरून सुरू होणे अपेक्षित आहे.
चाचणी फेरी पूर्ण
सफाळे ते न्यू उंबरगाव (संजाण) दरम्यान डी एस सी च्या इंजिनची चाचणी फेरी (ट्रायल रन) मध्यरात्रीनंतर घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्याने या मार्गावरून सफाळे पासून मालगाड्या थेट दिल्लीपर्यंत पाठवण्याचा मार्ग खुला झाला आहे. पश्चिम रेल्वे कडून येणाऱ्या व मुंबई व दक्षिणेच्या ठिकाणी जाणाऱ्या मालगाड्यांचा या समर्पित मालवाहू रेल्वे मार्गावरून प्रवास सुरू होणार असून आरंभी प्रत्येक अप आणि डाऊन दिशेला किमान २० मालगाड्या धावतील असे अंदाजीत करण्यात आले आहे. यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे रुळांवरील प्रवासी गाड्या वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून माल गाड्यांच्या प्रवास वेळेत बचत होणार आहे.
नवली उड्डाण पुलाचे काम जून पूर्वी होणार पूर्ण
नवली रेल्वे पुलाच्या ठिकाणी गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले असल्याने उर्वरित रेल्वे व्यवस्थापनाशी संलग्न असणारे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर या उड्डाणपुलाच्या पोहच मार्गावर एक नव्याने गर्डर उभारणे व इतर डांबरीकरणाची काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवली येथील उड्डाणपूल नागरिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.