पालघर: शिक्षकांच्या कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल तसेच पालघर या आदिवासी जिल्ह्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी पुढील कॅबिनेटच्या बैठकीत पेसा भरतीचा प्रश्न मांडून तो लवकरच सोडविण्याचा प्रयत्न राज्यशासन व शिक्षण विभाग करणार असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी राज्य अधिवेशनात केले.

पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अधिवेशन आज पालघर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष नरसू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या भरती, जुनी पेन्शन योजना, संच मान्यतेच बदल करणे, शिक्षकांवरील कामाचा ओझा दूर करणे, आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध करून देणे अशा व अनेक मागण्या उपमुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आल्या.

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ लागला असून मुख्यमंत्री असताना नवीन शिक्षण धोरण व काही निर्णय धाडसाने घेण्यात आले. तेव्हापासून शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत असून शिक्षकांना लवकरच इतर कामांचा ओझा दूर करून फक्त शिकवण्याचे काम देण्याचा प्रयत्न करू असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पेसा भरतीचा प्रश्न पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडून तो लवकरच सोडविण्याचा प्रयत्न राज्य शासन व शिक्षण विभागाकडे आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन २०२५ ची संच मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी झाली असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अनेक शाळांची पटसंख्या खाली जात होती. मात्र ती आता वाढते त्यामुळे शिक्षकांची संख्येचा विचार करू नका. तुमच्या सर्व अडचणी लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन यावेळी शिक्षकांना देण्यात आले.

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री दुपारी १.५० वाजता कार्यक्रमास्थळी आगमन झाल्यानंतर दोन वाजता आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात देश व महाराष्ट्रातील मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानी आतंकवाद्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. प्रधानमंत्री व अमित शाह यांनी हल्ल्याची घटना गांभीर्याने घेतली असून देशाच्या आत्म्यावरचा हा शेवटचा हल्ला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतले शिक्षकांचे पालकत्व

शिक्षकांना कोणीही वाली नसून शिक्षकांच्या अनेक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेण्याची इच्छा शिक्षक आघाडीने व्यक्त केली. आपण शिक्षकासाठी कधीही उपलब्ध असून काही प्रश्न किंवा अडचणी असल्यास मी सदैव पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी शिक्षकांचे पालकत्व घेतो असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाईल

कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाईल. आताप्रयत्न आपण गरजूंना न्याय देण्याचे काम केले. शिक्षक अनुदानाचा दुसरा टप्पा राहिला आहे ते देखील काम पूर्ण होईल. कोणावरही अन्याय होणार नाही असे यावेळी उपस्थित शिक्षकांना सांगण्यात आले.