डहाणू : गुढीपाडवा नवीन वर्ष आणि चैत्र नवरात्री निमित्त डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पालघर, ठाणे, मुंबई सह गुजरात मधील हजारो भाविकांनी रविवारी दर्शनासाठी गर्दी केली असून सोमवारी देखील भाविकांची वर्दळ दिसून आली.

पालघर जिल्ह्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात नियमित भक्तांची मांदियाळी असते. महालक्ष्मी मंदिरात इंग्रजी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष, शासकीय सुट्ट्या, दिवाळी, शारदीय नवरात्र, पितृ बारस सह श्रावण, मार्गशीष महिन्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तसेच चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पुढे पंधरा दिवस देवीचा जत्रोत्सव साजरा करण्यात येतो. या महिन्यातील १२ एप्रिल हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) पासून महालक्ष्मी जत्रेला सुरुवात होणार असून त्याआधी येणाऱ्या चैत्र नवरात्र निमित्त सध्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीचे पुरातन मंदिर आहे. विवळवेढे गावाच्या पश्चिमेला असलेल्या मुसळ्या डोंगरावर देवीचे मुख्य मंदिर असून एका भक्तासाठी देवी गडावरून खाली उतरून विवळवेढे गावात वसल्याची अख्यायिका पुजाऱ्यांकडून सांगितली जाते. विवळवेढे गावातील सातवी कुटुंब महालक्ष्मी देवीचे मुख्य पुजारी आहेत. पालघर मधील आदिवासी, कोळी, कुणबी सह ठाणे, नाशिक, मुंबई सह गुजरात राज्यातील हजारो कुटुंबांची कुलदैवत असलेल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मंदिरात येत असतात. सध्या चैत्र नवरात्र निमित्त नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी सुरू राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली.

महालक्ष्मी मंदिरात सण उत्सवात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली जातात. यामध्ये प्रसाद, हार नारळ, देवीचे शृंगार, पूजेचे साहित्य, खेळणी, महिलांची सौंदर्य प्रसाधने आणि विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अलीकडे मंदिर परिसरात ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून उत्पादित गावरान फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी महिलांकडून छोटी दुकाने थाटली जातात. या दुकानातून नैसर्गिक रित्या उत्पादित फळे आणि भाजी खरेदी साठी गुजरात आणि मुंबई कडील शहरी भागातील नागरिकांना कल वाढताना दिसत आहे. यातून आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होतो.

चैत्र नवरात्री नंतर १२ एप्रिल हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) पासून पुढे पंधरा दिवस महालक्ष्मी देवीची जत्रा आहे. जत्रेसाठी सध्या मंदिराची सजावट सुरू असून मंदिर परिसरात रंगकाम, रोषणाई, भाविकांसाठी सोयीसुविधा, जत्रेचे नियोजन करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जत्रेचे मुख्य आकर्षण असलेले पाळणे उभारणीचे काम साधारण महिन्याभरापासून सुरू आहे. जत्रेत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांची दुकाने उभारण्याची लगबग सुरू असून जमीन मोजणी, साफसफाईची कामे सुरू झाली आहेत. मात्र यंदा जत्रा लवकर सुरू होणार असून पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जत्रेच्या कालावधीत असल्यामुळे जत्रेवर याचा परिणाम होण्याची भीती सध्या व्यक्त होत आहे.