लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर: विक्रमगड तालुक्यातील औंदे येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या श्री स्वामी समर्थ मठातर्फे विक्रमगड तालुक्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या ११ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, स्कूल बॅग व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव कार्यक्रम रविवारी संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ परिवाराच्या लक्ष्मीकांत दांडेकर व अर्चना दांडेकर यांच्या पुढाकाराने संपन्न या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे अतिरिक्त पोलीस संचालक विजय पाटील, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार चारुशीला पवार, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संतोष पावडे, सदस्य सारिका निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-पालघर: श्रमजीवी तर्फे अज्ञानदिंडीचे आयोजन
शिक्षणापासून एकही मुलगा वंचित राहू नये विशेष करून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे हा उद्देश ठेवून लक्ष्मीकांत दांडेकर यांनी गेल्या २० वर्षापासून विक्रमगड तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना नित्यनेमाने दरवर्षी देत आहेत. याच बरोबरीने या संस्थेमार्फत नागरिकांसाठी व्यसनमुक्ती, तरुण मुलींसाठी वैद्यकीय शिबीर, सॅनिटरी पॅड चे वितरण व इतर उपक्रम राबविले जात आहेत.
दरवर्षी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जात असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम या संस्थेकडून राबविण्यात येतात. या मठाच्या माध्यमातून फक्त अध्यात्मिक विकास साधला गेला नाही तर अध्यात्मावर सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय असा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी भागात अशा प्रकारचे काम करणे आणि ते नियोजनबद्ध पद्धतीने करणे हे कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या प्रसंगी सांगितले.
आणखी वाचा-प्रसंगावधानामुळे चिमुकलीचे प्राण वाचले, पालघर तालुक्यातील माहीम येथील घटना
सातत्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम राबवीत असून अध्यात्माच्या जोडीने ज्ञानाची शिदोरी तुम्ही देत असल्याबद्दल उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी उपक्रमांचे कौतुक केले. आमचा हा विद्यार्थी पालक गरीब आहे हे लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेची धडपड आम्ही बघत आहोत. शासकीय योजनेतून विद्यार्थ्यांसाठी आपण फार तर पुस्तक देतो त्याच्या व्यतिरिक्त काही देत नाही. मात्र या या उपक्रमात इतर अनेक साहित्य विद्यार्थ्यांना प्राप्त होत असून हे विद्यार्थी पुढे जातील हा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे असे कृषी सभापती संदीप पावडे यांनी यावेळी सांगितले.