बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या वाहीन्यांमधून होत असलेल्या औद्योगिक सांडपाण्याच्या गळतीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत यांवर उपाययोजना आखण्यासाठी सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावण्यात आली आहे. तारापूर एमआयडीसीच्या एस विभागातील कारखान्यांमधील औद्योगिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या बंदिस्त वाहीनीच्या चेंबरमधून रासायनिक सांडपाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा प्रकार आठ एप्रिल रोजी उघडकीस आला होता.

याबाबत दैनिक लोकसत्तामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत उपाययोजना आखण्यासाठी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व संबंधित शासकीय विभाग, परिसरातील सरावली, कोलवडे, कुंभवली, खैरेपाडा, पास्थळ, सालवड या बाधित ग्रामपंचायती आणि नवापूर, नांदगाव, दांडी, मुरबे येथील मच्छीमार संघटना यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांकडून औद्योगिक सांडपाण्याची निर्जन ठिकाणी गुपचूप लावण्यात येणारी विल्हेवाट आणि एमआयडीसीच्या वाहीन्यांमधून होणारी सांडपाण्याची गळती यामुळे परिसरातील शेतजमिनी, नाले, ओढे, खाडी परिसर आणि समुद्रात जलप्रदूषण होऊन पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, शेतजमिनी प्रदूषित होत असल्याच्या तसेच खाडी आणि समुद्रातील मासे व इतर जलचर मृत्यूमुखी पडत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक ग्रामपंचायती आणि मच्छीमार संघटना यांच्यामार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांच्याकडे सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र जलप्रदुषणास कारणीभूत औद्योगिक सांडपाण्याच्या गळतीवर उपाययोजना आखण्यास किंवा अवैध विल्हेवाट लावणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिकांमार्फत होत आहे.

रासायनिक सांडपाण्याची अवैधरित्या विल्हेवाट :

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून निघणार्‍या रासायनिक सांडपाण्याची निर्जनस्थळी विल्हेवाट लावली जात असल्याच्या तक्रारी अनेकदा स्थानिकांमार्फत करण्यात येतात. औद्योगिक परिसरातील खैरेपाडा, भीमनगर, सरावली, सालवड, बाणगंगा हे ओढे-नाले मुरबे आणि दांडी या खाडीमार्गे पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पावसाळी दिवसांमध्ये जेव्हा नाले-ओढे तुडुंब भरून वाहत असतात तसेच इतर दिवसात रात्रीच्या अंधारात काही कारखाने आपल्या आवाराच्या बाहेरील गटारांमध्ये किंवा टँकरद्वारे रासायनिक सांडपाण्याची चोरीछुपे विल्हेवाट लावत असल्याचे आरोप केले जातात. तक्रारीनंतर स्थानिक पोलिसाकडून काही प्रकरणात कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकाराला कायमचा आळा घालण्यासाठी पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून नियमित गस्तीचा अभाव आणि मर्यादित मनुष्यबळ यामुळे कारवाई करण्यास अडथळे येत आहेत.

सामुदायिक सांडपाणी केंद्रात केली जाते प्रक्रिया :

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यत्वे करून मोठे, मध्यम, व लहान प्रकारचे रासायनिक, औषध निर्मिती, कीटकनाशक निर्मिती, व कापड यांवर प्रक्रीया करणारे तसेच अभियांत्रिकी,पोलाद आणि स्टील चे जवळपास १२०० कारखाने कार्यरत आहेत. औद्योगिक परीसरात सांडपाणी निर्माण करणारे लाल व नारंगी संवर्गातील एकूण ४४४ उद्योग आहेत. यापैंकी १०३ उद्योगांनी शून्य निकसन यंत्रणा बसविली आहे. मोठ्या व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांनी त्यांच्या उत्पादन प्रक्रीयेत निर्माण होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी प्रथम, द्वितीय, व काही उद्योगांनी तृतीय स्वरूपाची प्रक्रीया उभारलेली आहे. तसेच लघु उद्योगांनी त्यांच्याकडून निर्माण होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याकरीता प्राथमिक स्वरूपाची सांडपाणी सयंत्रणा तयार केली असून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून दररोज २४ ते २५ दशलक्ष लीटर सांडपाणी निर्माण होते. औद्योगिक सांडपाणी एमआयडीसीच्या भूमिगत वाहिन्यांद्वारे एकत्रित करून त्याच्यावर तारापूर पर्यावरण संरक्षण समिती (टीईपीएस) मार्फत कार्यान्वित असलेल्या ५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया करून झाल्यानंतर प्रक्रियाकृत सांडपाणी एमआयडीसीच्या भूमिगत वाहिनीद्वारे नवापूर जवळील समुद्रात ७.१ किलोमीटर खोलपर्यंत सोडण्यात येते.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूमिगत वाहिन्यांमधून औद्योगिक सांडपाणी गळतीमुळे निर्माण होत असलेले जल प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि सीईटीपी-टीईपीएस यांनी एकत्रित समन्वय साधत उपाययोजना आखण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राजू वसावे उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर