पालघर: महिन्याला ८० ते १०० मालगाड्याद्वारे स्टील तसेच अवजड वस्तूंची वाहतूक हाताळणाऱ्या बोईसर रेल्वे स्थानकालगतचे मालवाहू यार्ड बोईसर पश्चिमेला बीएआरसी च्या जुन्या गोडाऊन जवळ स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे. नवीन ठिकाणी यार्ड स्थलांतरित झाल्यास अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांची वर्दळ नागरी वस्तीमधून करणे भाग पडणार आहे. वर्षभरात नवीन यार्ड कार्यरत होण्याचे अपेक्षित असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू झाली नसून रेल्वेच्या या प्रकल्पाविषयी जिल्हा प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने रेल्वे व राज्य सरकार यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

बोईसर रेल्वे स्थानकाबाहेर सध्या मालवाहतुकीसाठी दोन यार्ड कार्यरत असून रेल्वे स्थानकालगत असणाऱ्या यार्डात ३० ते ३५ डब्यांच्या मालगाड्या उभ्या केल्या जातात. प्रत्येक मालगाडीतुन २२ टन वजनाच्या १००- १२० कॉईलची वाहतूक केली जात असून प्रत्येक मालगाडी मधून या कॉईल उतरवण्यासाठी आठ तास व त्यांची वाहतूक करण्यासाठी अतिरिक्त आठ तास असा अवधी दिला जातो. रेल्वे मालवाहू फलाटावरून या कॉईलची वाहतूक ३२ फूट (२८ टन) व ४२ फूट (४२ टन) लांबींच्या ट्रेलर मधून केली जात असून दिवसाला यार्ड पासून विविध कंपन्यांपर्यंत १८ टायरचे हे ८० ते १०० ट्रेलर दररोज ये-जा करत असतात. शिवाय खैरापाडा पुलाच्या पलीकडे असणाऱ्या मालवाहू यार्डातुन बोईसर, तारापूर मध्ये उत्पादित होणाऱ्या अवजड वस्तू (स्टील बीलेट) बाहेर पाठवण्यात येतात.

पश्चिम रेल्वेचा चौपदरीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला असून उमरोळी पर्यंत अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे मार्गीकेच्या पश्चिमेला नवीन मार्गीका उभारण्याच्या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे. मात्र बोईसर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मालवाहू यार्ड असल्याने सुमारे दोन अडीच किलोमीटर परिसरात चौपदरी करणाच्या दृष्टीने काम रखडून राहिले आहे. उपनगरीय क्षेत्रातील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या यार्डला चित्रालय परिसराच्या लगतच्या भागात नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून या सर्व प्रक्रियेत वाहतूक व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अनभीज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान बोईसर रेल्वे स्थानक ते नवीन यार्डाच्या ठिकाणी येणाऱ्या रेल्वे लाईनवर व त्यालगत अतिक्रमण झाले असून रेल्वे यार्डातून बाहेर पडणाऱ्या बोईसर चित्रालय रस्त्याच्या भागात देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. या भागातील अतिक्रमण दूर करणे तसेच या रस्त्यांची रुंदीकरण करण्याची आवश्यकता भासल्यास भूसंपादन करणे गरजेचे होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकल्पाविषयी रेल्वे तसेच संबंधित विभागाकडून माहिती घेऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना आखण्यात येतील असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.

पश्चिम रेल्वेची भूमिका

नवीन यार्ड उभारण्यात रेल्वे प्रशासन कार्यरत

बोईसर रेल्वे स्थानकापासून प्रस्तावित नवीन मालवाहू यार्डाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एक रेल्वे मार्गिका उपलब्ध असून मालगाड्यांमधील कॉईल,  बीलेट उतरवण्यासाठी तीन फलाटाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.

नवीन यार्ड कुठे असेल

तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अणु संशोधन केंद्रातील अवजड उपकरणे आणण्यासाठी बोईसर रेल्वे स्थानकापासून बीएआरसी कॉलनीच्या जवळ असणाऱ्या जुन्या गोदामापर्यंत पूर्वी रेल्वे लाईन टाकण्यात आली होती. याच रेल्वे मार्गीकेला पुनर्जीवित करून बीएआरसी च्या कॉलनी लगत नवीन रेल्वे यार्ड उभारण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी ७१५ मीटर लांबीचे दोन व ९०९ मीटर लांबीचा एक यार्ड फलाट उभारण्यात येणार असून या प्रत्येक यार्डातील फलाटाची रुंदी १५ मीटर प्रस्तावित आहे. बोईसर चित्रालय परिसरा जवळील हा मालवाहू यार्ड कार्यरत झाल्यानंतर सध्या खैराफाटक परिसरातून होणारी मालवाहतूक गजबजलेल्या वस्तीतून होणार आहे.

मालवाहू यार्डाचा बोईसर परिसराला काय परिणाम होणार

कुरगाव ते जिल्हा मुख्यालय संकुल हा रस्ता हायब्रीड ऍन्यूटी प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आला असून त्याची सध्याची रुंदी अवघी सात मीटर इतकी आहे. शिवाय नवीन रेल्वे मालवाहू यार्ड औद्योगिक वसाहती मधून होणारी वाहतूक ही एमआयडीसी नाका चित्रालय परिसरातून होणार असून यामुळे या भागात तुफान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

हा मार्ग तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आपत्कालीन मार्गांमध्ये समाविष्ट असून या मार्गाची रुंदी वाढवणे तसेच आपत्कालीन परिस्थिती स्थलांतर करण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक होणार आहे.

चित्रालय परिसरात मोठी बाजारपेठ असून रस्त्यावर बसणारे हॉकर, हातगाडी वाले व अतिक्रमण धारकांची संख्या मोठी आहे. २८ ते ४२ टन इतकी अवजड वाहतूक करणारी ८० ते १०० ट्रेलर या मार्गावरून जाणार असल्याने वाहने रस्त्याबाजूला रुतून बसू नये असेच अपघात टाळण्यासाठी रस्ता रुंद करणे व रस्त्या बाजूचे अतिक्रमण दूर करणे देखील आवश्यक होणार आहे. मात्र रेल्वेच्या मालवाहू यार्ड स्थलांतर प्रकल्पाविषयी जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली गेलेली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

उद्योगांना बसणार फटका

सध्या टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, करमतारा सारख्या उद्योगांचे स्टील उत्पादनातील कच्चा व तयार मालाची वाहतूक रेल्वेमार्फत केली जात आहे. हे सर्व उद्योग बोईसर रेल्वे स्थानक व तारापूर औद्योगिक वसाहतीच्या दक्षिणेच्या बाजूला स्थिर आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक करताना सध्या रहिवासी भागाला अडथळा होत नसून औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावरून थेट यार्डात ही वाहने पोहचत आहेत. बोईसरचे यार्ड स्थलांतर झाल्यास या सर्व उद्योगाला औद्योगिक वसाहत परिसरातून जाऊन एमआयडीसी नाका व चित्रालय या गजबजलेल्या वसाहती मधून मार्ग काढणे अधिक लांबीचे, अवघड व त्रासदायक होणार आहे. शिवाय मोठ्या आकाराचे ट्रेलर हाताळण्यासाठी मोजके रस्ते उपलब्ध असल्याने त्यांचे मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करणे देखील आवश्यक होणार आहे.