लोकसत्ता वार्ताहर
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्यामुळे निर्माण होणारे वाढते जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महिनाभरात कठोर उपाय योजना आखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. औद्योगिक सांडपाण्यामुळे समुद्रातील मासे मृत होण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत यावर कायम उपाययोजना आखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकारी, बाधित ग्रामपंचायती आणि मच्छीमार संघटना यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या भूमिगत गटारातून औद्योगिक सांडपाण्याची होणारी गळती आणि काही उद्योगांकडून टँकरद्वारे चोरीछुपे परिसरातील निर्जन ठिकाणी सांडपाण्याची लावली जाणारी विल्हेवाट यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन खाडी आणि समुद्रातील मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी तारापूर मधील प्रदूषणाची गंभीर दखल घेत गुरुवारी सर्व संबंधित विभाग आणि बाधित गावांची जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपविभागीय अधिकारी सुनील माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश संखे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे आणि वीरेंद्र सिंग, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रशेखर जगताप यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्यामुळे होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाय योजना अमलात आणण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन पुढील महिनाभरात त्याचे दृश्य परिणाम दिसले पाहिजेत अशी सक्त ताकीद दिली. एमआयडीसी विभागाने सांडपाणी वाहून नेणारी सर्व भूमिगत गटारे आणि वाहिन्यांची तपासणी करून तात्काळ दुरुस्ती करणे, पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून टँकरद्वारे निर्जन ठिकाणी केल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करणे, एमआयडीसी परिसरात पाण्याच्या टँकर वाहतुकीविरोधात जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल आणि वायू प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर देखरेख ठेवणे, संशयित किंवा तक्रार आलेल्या उद्योगाविरोधात तात्काळ पाहणी करून कारवाईबाबत अंमलबजावणी करणे, ५० दशलक्ष लिटर क्षमता असलेले सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे इत्यादी उपायोजना यावेळी सुचवण्यात येऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
औद्योगिक सांडपाण्यामुळे जलप्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांकडून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाण्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्यामुळे औद्योगिक क्षेत्र परिसरातील सरावली, खैरेपाडा, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, सालवड, पास्थळ, पाम, नवापूर, नांदगाव, आलेवाडी, मुरबे, कुंभवली या ग्रामपंचायत हद्दीमधील शेती आणि बागायती सोबतच कूपनलिका, विहिरी, तलाव सारखे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊन पर्यावरणाचे नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील औद्योगिक सांडपाण्यामुळे निर्माण होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तारापूर औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून पुरेसा उपाययोजना होत नसल्यास आरोप केला जात आहे.
सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची गरज
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यत्वे करून मोठे, मध्यम, व लहान प्रकारचे रासायनिक, औषध निर्मिती, कीटकनाशक निर्मिती, व कापड यांवर प्रक्रीया करणारे तसेच अभियांत्रिकी,पोलाद आणि स्टील चे जवळपास १२०० कारखाने कार्यरत आहेत. औद्योगिक परीसरात सांडपाणी निर्माण करणारे लाल व नारंगी संवर्गातील एकूण ४४४ उद्योग आहेत. यापैंकी १०३ उद्योगांनी शून्य निकसन यंत्रणा बसविली आहे. मोठ्या व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांनी त्यांच्या उत्पादन प्रक्रीयेत निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी प्रथम, द्वितीय, व काही उद्योगांनी तृतीय स्वरूपाची प्रक्रीया उभारलेली आहे. तसेच लघु उद्योगांनी त्यांच्याकडून निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याकरीता प्राथमिक स्वरूपाची सांडपाणी सयंत्रणा तयार केली आहे.
तारापूर येथील सीईटीपी-टीईपीएस चालवीत असलेल्या ५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सद्य स्थितीत फक्त २५ दशलक्ष लिटर औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर प्रक्रियाकृत सांडपाणी एमआयडीसीच्या भूमिगत वाहिनीद्वारे नवापूर जवळील समुद्रात ७.१ किलोमीटर खोलपर्यंत सोडण्यात येते. मात्र तारापूर मधील उद्योगांमध्ये २५ दशलक्ष लिटर पेक्षा अधिक सांडपाणी निर्माण होत असल्याचा अंदाज असून जास्तीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नसल्यामुळे या सांडपाण्याची भूमिगत गटारांच्या चेंबर मधून गळती होण्याचे प्रकार घडत आहेत. सांडपाण्याची गळती रोखण्यासाठी ५० दशलक्ष लिटर क्षमतेचा सामुदायिक सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात जास्त सांडपाणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सालवड येथील बंद असलेल्या जुन्या २५ दशलक्ष लिटर सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाची दुरुस्ती करून तो देखील कार्यान्वित करण्याची गरज आहे.
घरगुती सांडपाण्याची विना प्रक्रिया विल्हेवाट
तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. बोईसर आणि परिसरातील दहा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक नागरिक राहत आहेत. लाखोंच्या संख्येने नागरिक राहत असलेल्या इमारती आणि झोपडपट्टी परिसरातून निघणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही यंत्रणा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही. मोठ्या गृहसंकुलांनी उभारलेले सांडपाणी प्रकल्प अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असून मलमूत्रयुक्त सांडपाणी विना प्रक्रिया नैसर्गिक नाले, ओहोळ यांच्याद्वारे खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे जल प्रदूषणास कारणीभूत औद्योगिक सांडपाण्यासोबत घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी देखील यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.