देशात मालवाहतुकीसाठी रेल्वे सर्वात जलद व किफायतशीर मार्ग आहे. यासाठी डबल डेकर मालगाड्यांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका करण्याची योजना आखली. मात्र हा समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडचणी समोर असल्याने डबल डेकर मालगाडी सुरू होण्यास अजूनही आठ ते नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विशेष उद्देश वाहन उभारून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या समर्पित मालवाहू रेल्वे मार्गामुळे मालवाहतूक व विशेषता कंटेनर हाताळने अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात आली.

या समर्पित मालवाहू रेल्वेची पश्चिम मार्गिका जेएनपीएपासून दादरीपर्यंत उभारण्यात येत असून वडोदरा, अहमदाबाद, पालनपूर, फुलेरा, रेवरी दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे मार्गाच्या लगत या प्रकल्पातील दोन मार्गिका उभारण्यात येत आहेत. तर दिवा, सुरत, अंकलेश्वर, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, पालनपूर, फुलेरा व रेवरी येथे अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेपासून काही दूरवर या मार्गिकेची उभारणी करण्यात आली. ही मार्गिका उत्तर प्रदेश (१८ किमी), हरियाणा (१७७ किमी) , राजस्थान (५६७ किमी), गुजरात (५६५ किमी) व महाराष्ट्र (१७७ किमी) अशा पाच राज्यांतून १५०४ किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणार आहे. यापैकी दादरी ते वैतरणा (१४०२ किलोमीटर) अंतरावर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून दादरी ते उंबरगाव अशा १३२२ किलोमीटरवरून मालगाडी वाहतूक मार्च २०२४ पासून सुरू झाली आहे.

पालघर (नवली) व सफाळे येथील रेल्वे फाटक बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे प्रशासनाला ना हरकत परवानगी देऊन त्या संबंधात अध्यादेश जारी केले होते. मात्र येथे उड्डाणपुलांचे काम प्रलंबित राहिल्याने नागरिकांकडून प्रखर विरोध झाल्याने प्रत्यक्षात फाटक सुरू राहिली आहेत. सफाळे येथील उड्डाणपूल एप्रिल महिन्याच्या आरंभी सुरू होणार असून पालघर नवली फाटकाच्या बाजूला हलक्या वाहनांसाठी पर्यायी हंगामी भुयारी मार्ग तयार केला असून सफाळे येथे अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे रुळांची व डीएफसी रुळ जोडण्याकरिता व्यवस्था उभारणे प्रलंबित आहे. हे पाहता या मार्गिकेवरून मालगाड्या सुरू होण्यास एप्रिलचा मध्य उजाडेल अशी शक्यता आहे.

असे असले तरीही वैतरणा ते जेएनपीए या १०२ किलोमीटर अंतराच्या समर्पित मार्गिकेची उभारणी अजून सुरू असून हे काम या वर्षाखेर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे दादरीपासून सफाळ्यापर्यंत समर्पित मालवाहू रेल्वे मार्गिकेचा वापर झाला तरी पुढे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रुळांचा वापर करणे अनिवार्य ठरणार आहे. पश्चिम रेल्वेचे विद्युत ट्रॅक्टर व त्यावरील अंतर सुमारे आठ मीटर उंच असून समर्पित मालवाहू मार्गिकेवरील पूल १० मीटरच्या जवळपास उंचीचे आहेत. जोपर्यंत पश्चिम रेल्वेच्या अस्तित्वात असणाऱ्या रुळांचा वापर करावा लागेल तोपर्यंत डबल डेकर मालगाडी या स्वतंत्र मार्गिकेवरून जाऊ शकणार नाही हे स्पष्ट आहे.

नागरिकांचा आशावाद व प्रतीक्षा

पश्चिम रेल्वेवर व विशेषत: उपनगरीय क्षेत्रात प्रवासी वाहतुकीबरोबर मालगाड्यांची मोठ्या प्रमाणात यातायात असून त्यामुळे रुळांवरून गाड्या चालवण्याची क्षमता संपुष्टात आल्याचे रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या स्तरावर उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या वेळी उत्तर दिले आहे. मालगाड्यांची वाहतूक समर्पित मालवाहू मार्गांवरून झाली तर विरार ते डहाणू पट्ट्यातील रेल्वे यंत्रणा काहीशी मोकळी होऊन उपनगरीय गाड्यांची संख्या वाढेल या आशेवर या भागातील लाखो नागरिक गेल्या काही वर्षांपासून बसून राहिले आहेत.

समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २० अप व २० डाउन मालगाड्या या स्वतंत्र मार्गिकेवरून धावण्याचे प्रस्तावित असून इतर मालगाड्या पश्चिम रेल्वेच्या जुन्या मार्गिकेवरूनच धावतील, असे विचाराधीन आहे. अशा परिस्थितीत विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांना नवीन सेवांचा किती प्रमाणात लाभ मिळेल हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे. शिवाय नवीन सेवांकरिता गाड्यांच्या रेकची उपलब्धता व इतर अनेक तांत्रिक मुद्दे पुढे केले जात असून दररोज नोकरी-धंद्यासाठी जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना रेल्वेतील आरामदायी प्रवास केव्हा मिळेल याबद्दल साशंकता आहे.

लॉजिस्टिक पार्कची उभारणी समर्पित मालवाहू रेल्वे मार्गिकेवरून कंटेनरसह खत, अन्नधान्य, मीठ, कोळसा, पोलाद, स्टील व सिमेंटसारख्या वस्तूंची वाहतूक होणार असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर कल्याण, उल्हासनगर, वाशी, बेलापूर या मुंबई, नवी मुंबई जवळील पट्ट्यात तसेच गुजरातमध्ये वापी, अहमदाबाद, गांधीधाम व राजस्थानमध्ये जयपूर व एनसीआर येथे लॉजिस्टिक पार्क उभारणे प्रस्तावित आहे. शिवाय या समर्पित मालवाहू रेल्वेमुळे वाढवण व मुरबे येथे उभारण्यात येणाऱ्या दोन बंदरांमधून होणाऱ्या मालवाहतुकीसाठी जोडण्यात आल्याने बंदरामधील मालवाहतुकीसाठी या मार्गिका उपयुक्त ठरणार आहेत.