लोकसत्ता वार्ताहर
बोईसर : अंधेरी पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अटकेची भीती दाखवत बोईसरमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्या आठ जणांच्या टोळीस जेरबंद करून लुबाडलेल्या रकमेंपैकी २२ लाख रुपये गोठविण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने बोईसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
बोईसर तारापूर येथे राहत असलेल्या ७१ वर्षीय अनिल कुमार आरेकर या एलआयसी मधील अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या ७१ वर्षाच्या वृद्ध नागरिकाला त्यांच्या मोबाईलवर प्रदीप सावंत हे बनावट नाव धारण केलेल्या इसमाने डिसेंबर २०२४ मध्ये फोन केला. आपण अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलत असून तुमचा मोबाईल नंबर बेकायदेशीर जाहिरात व शारीरिक मानसिक त्रास देण्याच्या प्रकरणात सापडला आहे. तुमच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) होणार आहे. तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निघाले असून पुढच्या १० मिनिटात पोलीस तुमच्या घरी पोहोचतील. या प्रकरणाची गुप्तता ठेवली नाही तर पाच वर्षांची जास्त शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल अशा प्रकारची भीती अनिल कुमार आरेकर यांना दाखवली.
त्यानंतर कॉन्फरन्स कॉलवर प्रमोद शंकर भोसले नावाच्या आणखी एका बनावट व्यक्तीने आपण सीबीआयचे सरकारी वकील आहोत, तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असून तुम्हाला यातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगू ते ऐकावे लागेल. तुम्ही आमचे ऐकले नाही तर तुमच्या मुलीला त्रास होईल असे सांगत तुमच्या बँक खात्यांमधील सर्व रक्कम दिलेल्या बँक खात्यांवर पाठवा. रिझर्व बँक व सीबीआय हे सर्व प्रकरणाची चौकशी करून १० मार्चपर्यंत तुम्हाला तुमची रक्कम परत करतील अशाप्रकारे आश्वासित करण्यात आले.
डिजिटल अटकेच्या भीतीने घाबरलेल्या अनिल कुमार आरेकर यांनी आपल्या विविध बँक खात्यांमधून तीन कोटी ५६ लाख ६० हजार रुपये त्यांना सांगण्यात आलेल्या बँक खात्यावर पाठवले. मात्र डिजिटल अटक करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाठवलेली रक्कम १० मार्चपर्यंत परत बँक खात्यात न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री आरेकर यांना झाली. या आर्थिक फसवणूक प्रकरणी त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आंतरराज्य टोळीला अटक; विदेशात देखील पाळेमुळे असल्याचा संशय
डिजिटल अटकेची भीती दाखवत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची साडेतीन कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अतिशय गांभीर्यांने घेतली. गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी बोईसर पोलीस ठाणे आणि पालघर सायबर पोलीस ठाणे यांचे पथक तयार करण्यात आले.
पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेली जवळपास दीड हजार मोबाईल सिम कार्ड, फिर्यादीच्या बँक खात्यांमधून विविध व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा झालेले पैसे व तांत्रिक माहितीच्या आधारावर यशस्वी माग काढत पोलिसांनी नागपूर येथून सैफ अहमद रिजवान अन्सारी, फैज अहमद रिजवान अन्सारी, झोएब अहमद रिजवान अन्सारी, गुणवंत रामराव मते व गुजरातच्या अंकलेश्वर येथून झाकरीया झोया, शोएब शहा, रिजवान मलिक आणि बिहार मधून बाबर सिराज खान या आठ जणांच्या टोळीला अटक केली आहे. या गुन्ह्यात देशाबाहेरील दुबई आणि कंबोडिया येथे वास्तव्यात असलेले आणखी काही आरोपीं सहभागी असण्याची शक्यता असून महाराष्ट्र सायबर पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.