नीरज राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यु-डायस प्लस प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या रक्तगटाची माहिती भरण्याची तरतूद करण्यात आली असून पहिली ते १२ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासणीसाठी शालेय स्तरावर सुनियोजित कार्यक्रम हाती घेण्याचे शिक्षण तसेच आरोग्य विभागाने आखणी केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीच्या काही दिवसांपूर्वी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा तपशील भरताना रक्तगटाची माहिती उपलब्ध नसल्याने शैक्षणिक आस्थापनांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना काही दिवसांच्या मुदतीत रक्तगट तपासून आणण्याचे फर्मान काढल्याने ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रक्त तपासणी केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे दिसून आले होते. इतकेच नव्हे तर शासकीय आस्थापनामध्ये रक्त गट तपासणी संच (किट) व त्यासाठी लागणारा रसायनसाठा संपल्याचे दिसून आले. त्यामुळे काही पालकांना खाजगी प्रयोगशाळांमध्ये १०० ते १५० रुपये खर्च करून रक्तगटाची तपासणी करण्यात आली. काही शाळांनी खाजगी प्रयोगशाळेच्या मदतीने आपल्या शाळेत विशेष शिबिरे आयोजित केली मात्र त्याचा भुर्दंड पालकांना सोसावा लागला.

हेही वाचा >>> डहाणू नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण, एका व्यक्तीवर गुन्हा दाखल, अटकेची मागणी घेऊन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पालघर जिल्ह्यात पहिली ते बारावी इयत्तेमध्ये सुमारे आठ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी आजवर ५८२३ विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात तर २०९२ विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रक्तगट तपासणी करून घेतली असून जिल्ह्यातील संख्येच्या तुलनेत फक्त एक टक्का विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी झाल्याचे दिसून आले आहे. उर्वरित ठिकाणी शिक्षकांनी तपासणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत यु-डायस प्लस मधील माहिती अपलोड केल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा >>> तानसा अभयारण्याच्या लगत प्रदूषणकारी उद्योग

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची एकंदर संख्या पाहता विद्यार्थ्यांना आरोग्य संस्थांमध्ये बोलवून रक्तगट तपासणी करण्याऐवजी शैक्षणिक संस्था स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून रक्तगट तपासणी करण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागाने योजली आहे. यासाठी लागणाऱ्या विशेष संच व रसायन साठा उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधी म्हणून आर्थिक तरतूद करण्यात येणार असून आगामी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्ण केली जाईल यासाठी आखणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधला असता रक्तगट तपासणी व माहिती यु-डायस प्लस पोर्टलवर टाकणे शासनाने सतीचे केले नसले तरी आगामी शैक्षणिक वर्षापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी केली जाईल व त्यासाठी पूर्वतयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘यू- डायस’ मध्ये एका विद्यार्थ्याची विविध प्रकारची माहिती भरावी लागत असून त्यात वैयक्तिक माहिती, संपर्क, अपंगत्व असल्यास त्याची माहिती, मागील वर्षीचे विद्यार्थ्यांचे गुण, हजेरीचे दिवस, स्कॉलरशिप किंवा इतर सुविधा मिळत असल्यास त्याची संपूर्ण माहिती तसेच रक्तगट, वजन व उंची त्यांची पूर्ण माहिती भरावी लागते. तेव्हा कुठे तो फॉर्म अपलोड होतो. काही शिक्षक यापूर्वी आधारकार्ड नोंदणी करणे, ते अपडेट करणे, बँकेत खाती उघडणे अशी एक ना अनेक शालाबाह्य कामे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना सक्तीने करायला शासनाकडून भाग पाडले जात आहे. त्यामुळे शिकवण्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight lakh students to be tested for blood group for uploading information on student portal before next academic year in palghar zws