रमेश पाटील
वाडा : चार महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत गारगांव गटात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत अटीतटीची लढत झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. संपूर्ण तालुक्यात होणाऱ्या कार्यक्रमांपेक्षा गारगावमध्ये या दोन्ही पक्षांचे कार्यक्रम जास्त होऊ लागले आहेत.
वाडा तालुक्यातील गारगाव व अबिटघर परिसरातील जवळपास ४०हून अधिक गावे ही शहापूर विधानसभा मतदारसंघात येतात. या भागावर चांगले वर्चस्व राखून असणारे शहापूरचे तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांनी तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या समर्थकांत चढाओढ दिसून येते. गारगाव, अबिटघर या दोन्ही गटांत नुकतीच झालेली जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली होती. प्रचारासाठी एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, दादा भुसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आदी नेते आले होते. जणू काही दरोडा विरुद्ध बरोरा अशीच लढत असल्याचा रंग कार्यकर्त्यांनी या निवडणुकीस दिला होता. गारगाव गटातील विविध गावांत एकाच दिवशी शिवसेनेच्या २४ शाखा उघडून आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी आमदार निधीतून गारगाव व अबिटघर या दोन गटांसाठी दोन रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. अतिदुर्गम भागातील आदिवासी पाडय़ातील पाणी टंचाई, प्रस्तावित गारगाव प्रकल्पातील आदिवासींचे पुनर्वसन, भरपाई अशा मूलभूत प्रश्नांबद्दल विचार करण्यास या दोन्ही नेत्यांना वेळ मिळेल का असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.