लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : उन्हाळा सुरू होताच डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत ताडगोळे दाखल झाले आहेत. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू असून महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गुजरात आणि मुंबई कडील ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक असल्याचे निदर्शनास येत असून याच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला नफा मिळत आहे.

उन्हाळी फळ असलेल्या ताडगोळ्याला “आईस ऍपल” संबोधले जाते. पांढरेशुभ्र फळ, रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे सेवन शरीरासाठी लाभदायक असल्याने सध्या फळे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. पालघर मधील डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यांमध्ये ताडगोळ्यांची विक्री केली जात असून सध्या बाजारात ८० ते १२० रुपये डझन भावाने ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे.

ताडाच्या झाडावर उन्हाळ्याच्या हंगामात येणारी ही फळे चवीला गोड असून यामध्ये व्हिटॅमिन सी, खनिज आणि लोह असल्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. डहाणू तालुक्यात ताडाची (माड) झाडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुंबई, नाशिक भागात या फळांना चांगली मागणी आहे. डहाणू तालुक्यातील सध्या ८० ते १२० रुपये डझन प्रमाणे फळांची विक्री सुरू असून इतर ठिकाणी फळे १६० ते २०० रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

ताडगोळे सोलून विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. डहाणू मधील मोठ्या बागायतींमध्ये ताडाची झाडे उपलब्ध असून विक्रेत्यांना स्वतः झाडावर चढून फळे खाली पाडवी लागतात. फळे खाली पडल्यानंतर त्यांची सोलून विक्री केली जाते. महालक्ष्मी मंदिर परिसरात गुजरात मधील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे येथे ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरात १० ते १२ दुकानदार ताडगोळे विक्री करत असून महालक्ष्मी जत्रेत २५ ते ३० दुकानदार ताडगोळे विक्रीसाठी दाखल होत असून मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची विक्री केली जाते.

ताडगोळे चवीला चांगले लागत असून उन्हाळ्यात याचे सेवन शरीरासाठी लाभदायक आहे. याच्या सेवनामुळे उष्माघात सारख्या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. गुजरात च्या तुलनेत महाराष्ट्रात फळे स्वस्त दरात मिळत असून ताजी फळे उपलब्ध असल्यामुळे आम्ही प्रत्येक फेरीला फळांची खरेदी करतो. -बळवंत ठाकूर, ग्राहक भरूच, गुजरात

आम्ही गेल्या चार ते पाच वर्षांपासून ताडगोळे विक्री व्यवसायात कार्यरत आहोत. महालक्ष्मी मंदिर परिसरात आम्ही ताडगोळे विक्री करून आमचा उदरनिर्वाह करतो. फळे आणून त्यांची विक्री करेपर्यंत मोठी मेहनत करावी लागते. मात्र याच्या विक्रीतून आम्हाला चांगला नफा मिळवता येतो. -सुरेश पऱ्हाड, विक्रेते विवळवेढे