मोरेकुरण- दापोली रस्त्याच्या ७०० मीटर भागावर बांधकामे

पालघर: सागरी महामार्गाला जोडणाऱ्या मोरेकुरण- दापोली या रस्त्यावर सुमारे ७०० मीटर भागावर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाल्यामुळे या मार्गावर नवीन विद्युत वाहिनी टाकण्यास अडचण निर्माण झाली आहे. या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामस्थांनी विविध पातळीवर तक्रारी करून पाठपुरावा केला असून महसूल विभाग या विरुद्ध कारवाई करण्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.

साडेतीन किलोमीटर लांबीच्या मोरेकुरण- दापोली रस्त्यासाठी सध्या सरासरी १४ ते १५ मीटर जागेची उपलब्धता आहे. मोरेकुरण- दापोली या रस्त्याचे ४५ मीटर रुंदीकरण करून सागरी महामार्गाला जोडरस्ता म्हणून या मार्गे जोडण्याचे प्रस्तावित होते. मात्र रस्त्याच्या उभारणीच्या किमतीपेक्षा भूसंपादनाचा खर्च अधिक असल्याने या मार्ग सात मीटर डांबरी धावपट्टी करून दुतर्फा प्रत्येकी अडीच मीटर रुंदीकरण असे १२ मीटर रुंदीचा रस्ता उभारणे प्रस्तावित होते.

आपल्या पूर्वजांना ही जमीन सरकारने बक्षीस दिली असल्याचे सांगून रस्त्याच्या सुमारे ७०० मीटर भागात काही स्थानिकांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाला रोख लागला आहे. विशेष म्हणजे रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या बाजूने पालघरहून दापोली गावाकरिता पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली असून त्याच्या देखभाल- दुरुस्तीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या मोरेकुरण व दापोली गावाला कोळगाव येथून विद्युत पुरवठा होत असून त्यामध्ये बिघाड होतो. या मार्गात ओहळ व खाजण जमीन असल्याने विद्युत वाहिनी तुटल्यानंतर दुरुस्ती करण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे पालघर येथून ११ किलोवॅट क्षमतेची विद्युत वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित असून अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने आपल्या भागातून वीज वाहिनी टाकण्यास मज्जाव केल्याने गावाचे विद्युतीकरण प्रकल्प रखडलेला आहे.

कारवाईच्या वल्गनाच

या विषयी ग्रामस्थांनी विविध पातळीवर तक्रार नोंदविण्यात्त आली असून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार यांना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कारवाई केली जात नसल्याने विद्युतप्रवाह खंडित झाल्यास हे गाव सलग अनेक दिवस अंधारात राहत आहेत. या संदर्भात पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता या मार्गावरील अतिक्रमणाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.