लोकसत्ता वार्ताहर
वाडा : वाडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतरण होऊन जवळपास आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र वाडा शहरातील अनेक समस्या आजही कायम आहेत. नगरपंचायत होऊनदेखील समस्या सोडवता येत नसतील तर पूर्वीची ग्रामपंचायतच बरी होती, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. वाडा नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग आहेत. या सर्वच ठिकाणी रस्ते, गटार, कचरा, अपूर्ण कामे, श्वानांचा उपद्रव, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग अशा समस्या आहेत.
नगरपंचायत म्हणजे २०१७ ते २०२५ पर्यंत नऊ प्रभारी मुख्याधिकारी तर चार वेळा पूर्णवेळ मुख्याधिकारी झाले आहेत. मात्र इतके मुख्याधिकारी होऊनदेखील म्हणावी तशी सुधारणा, नियोजन किंवा विकास होऊ शकलेला नाही. वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांचे मागील दोन वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र यातील अनेक रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाहीत, तर काही ठिकाणचे काम नित्कृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गटारांची दुरवस्था
रस्त्यांचे काँक्रीटीकरण करताना ठेकेदाराकडून गटाराचेही काम होणे अपेक्षित होते, मात्र ती कामे झालेली नाहीत त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. सांडपाण्याचे वहन योग्य प्रकारे होत नसल्याने गटारे तुंबत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी येत असल्याने नागरिक त्रस्त होत आहेत.
कचऱ्याच्या विल्हेवाटीचे आव्हान
वाडा नगरपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरोघरी व इमारतीत डिजिटल प्रणालीचा अवलंब करून ‘क्यूआर कोड’ बसविले आहेत. मात्र ही प्रणाली केवळ कागदावरच आहे की काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. वाडा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाद्वारे सुका व ओला असा सुमारे ७ टन कचरा दररोज उचलला जातो. यासाठी १० घंटागाड्या व साधारण ४० सफाई कामगार कार्यरत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका २८ फेब्रुवारी रोजी संपला आहे. ठोक्यावरील कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीने सध्या कंत्राटी पद्धतीवर कामावर ठेवले आहे.
प्रशासनाचे म्हणणे…
वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी सांगितले की, केरकचरा उचलण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर सुरू आहे. यासाठी सफाई कर्मचारी प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या घरी व इमारतीत जावून कचरा गोळा करतात आणि तेथील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करतात. तसेच त्याचे ट्रॅकिंग होत असल्याने त्याचा अहवाल नगरपंचायतीला मिळतो.
नागरिकांचा आरोप
कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचारी अनेक ठिकाणच्या इमारतीत किंवा परिसरात मागील एक ते दीड वर्षांपासून पोहचलेले नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने नागरिक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्यावर टाकत आहेत. तो वेळेवर उचलला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
इमारतीमधील कचरा उचलण्यासाठी जिथे रस्ता आहे तिथे गाड्या पाठविल्या जातात. अनेक इमारतीच्या ठिकाणी रस्ता नसल्याने गाड्या पोहचू शकत नाहीत. -अमोल बायकर, कनिष्ठ अभियंता, पाणी व स्वच्छता विभाग, वाडा नगरपंचायत
अपूर्ण कामाने नागरिक त्रस्त
स्टेट बँक ते वाडा पंचायत समिती रोडवरील काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने गटार न करताच तसाच ठेवला आहे. या रस्त्यावरून चालताना नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी येथे माती भराव केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होणार नसल्याने मातीचा चिखल होईल व तो चिखल इमारती परिसरात गेल्यास त्यांना या समस्येचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून आमच्या अपार्टमेंटमध्ये कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचारी फिरकला नाही, त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न आम्हाला पडतो.तसेच गटाराची व्यवस्था न झाल्यास आमच्या इमारतीखाली चिखल होईल. -सई शेट्टे, गृहिणी, वाडा.