पालघर : पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या अनेक ठिकाणी स्मशानभूमी नसल्यामुळे आणि असल्या तरी तेथपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ता नसल्यामुळे मृतदेहांवर नदी, ओहोळ व नाल्याकिनारी अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे. पावसाळय़ात तर मोठय़ा प्रमाणात अडचणी येत असल्यामुळे नातेवाईकांचे हाल होत आहेत. मात्र याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
पालघर : पालघर तालुक्यातील अनेक भागांमध्ये स्मशानभूमीअभावी उघडय़ावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक अडचणी उद्भवत आहेत. तालुक्यातील केळवे भागामध्ये दांडाखाडी येथे स्मशानभूमीचा प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे नागरिकांना उघडय़ावर अंत्यसंस्कार करावे लागतात अलीकडेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला अंत्यसंस्कार करून नागरिकांनी आंदोलन केले होते. मनोर भागांमध्ये हातनदी पुलावर रस्त्याच्या कडेला असलेली स्मशानभूमी तसेच कोळसा पूल, रईसपाडा, भोईरपाडा येथील स्मशानभूमी पावसाळादरम्यान पाणी साचल्याने पाण्याखाली जातात, त्यामुळे या भागातील नागरिकांना हायस्कूल डोंगरी या पठारी परिसरात खडकाळ जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. भोईरपाडा स्मशानभूमी पाण्याखाली जात नसली तरी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात.
बोईसर : डहाणू तालुक्यातील रणकोळ बोडणपाडा येथे स्मशानभूमीअभावी भर पावसात सरणावर नारळाच्या झावळय़ांचे छप्पर करून मृतदेहाला अग्नी देण्याची नामुष्की ओढवली आहे. याठिकाणी स्मशानभूमी आणि रस्ता उपलब्ध नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळय़ात स्मशानभूमीअभावी मृत व्यक्तीच्या शेतातच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे ग्रामस्थ सिकिन करमोडा यांनी सांगितले. रणाकोळ गावात १८ पाडे असून स्मशानभूमीअभावी अनेक अडचणी निर्माण होत असल्याची खंत उपसरपंच मुलचंद बोलाडा यांनी व्यक्त केली आहे.आदिवासी बहुल ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. मात्र २०१४ साली स्थापन झालेल्या जिल्ह्याला नऊ वर्षे पूर्ण होऊनदेखील आजही जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिकांना मूलभूत सूविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
उघडय़ावर अंत्यसंस्कार
डहाणू तालुक्यातील आंबोली पटारपाडा येथे स्मशानभूमी नसल्यामुळे एका ओढय़ाच्या पलीकडे उघडय़ावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. रविवार, ३० जुलै रोजी येथील रहिवासी उखरडय़ा राध्या पानगा यांच्या मृत्यू पश्चत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आप्तेष्टांना ओहोळाच्या पात्रातून त्यांचा मृतदेह न्यावा लागला. दहनासाठी सरपण (लाकडे) देखील पाण्यातून नेण्याची वेळ आल्याची माहिती ग्रामस्थ संदीप पटारा यांनी दिली आहे.
नदीतून मृतदेह नेण्याची वेळ तलासरी तालुक्यातील गिरगाव डोल्हारपाडा, डावरपाडा येथे स्मशानभूमी नसल्यामुळे नदीपलीकडच्या गावात अंत्यविधी करावा लागत आहे. शनिवार २९ जुलै रोजी डोल्हारपाडा येथे एका स्थानिकाचा मृत्यू झाला होता. भरपावसात नदीला पूर आल्यामुळे मृतदेह वाहत्या पाण्यातून न्यावा लागला. या घटनेची चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक करत आहेत.