पालघर : बोईसर पूर्व परिसरात दगड खदानीत मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन होत आहे. अनेक खदानी २०० फूटपेक्षा अधिक खोलीवर गेल्या आहेत. खदानींमध्ये साचलेल्या पाण्याचा उपसा करून फेकले जात असल्याने परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईची निर्माण झाली आहे.
लालोंडे, नागझरी, गुंदले, निहे या भागांमध्ये हे उत्खनन होत आहे. बेसुमार दगड उत्खनन होत आहे. उत्खनन करताना सहा मीटर लांबी व उंचीच्या पायºया करत उतार करणे अपेक्षित असताना हा व इतर नियम धाब्यावर बसून २०० ते २५० फूट खोलीपर्यंत सरळ खोल खदानी करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या पृष्ठभागावरून खोदकाम करणारे पोकलँड अथवा दगड वाहणारे डंपर यांना खदानींमधून जमिनीवर पोहोचण्यासाठी २० ते २२ मिनिटांचा अवधी लागत आहे. अनेक खदानी लोकवस्तीपासून १५०-२०० फूट अंतरावर असून स्फोटामुळे घरांना हादरा बसत आहे. यासंदर्भात ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीने अनेकदा तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारांमध्ये यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारींनाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे. दुसरीकडे तक्रार करणाºयांविरुद्ध बेकायदा उत्खनन करणाºयांकडून होणाºया दमदाटीने त्रस्त झाले आहेत. खदानीत साचून राहत असलेल्या पाण्यावर परिसरातील विहिरी व कूपनलिका यांच्या पाण्याची पातळी अवलंबून आहे. दगड उत्खनन हंगाम सुरू झाल्यानंतर खदानीमध्ये साचलेले पाणी डोंगराच्या पूर्वेच्या बाजूला किराट गावाच्या बाजूने विविध शेतांमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे शेती, बागायतीचे नुकसान होते. लगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे.
लालोंडे, नागझरी, गुंदले व निहे परिसरात किमान १५-२० मोठ्या खदानी आहेत. यामधून दररोज प्रत्येकी पाच-सहा ब्रासच्या ५० ते १०० गाड्या दगडाचे उत्खनन होते. मंजुरीपेक्षा अधिक क्षमतेने वाहतूक होत असल्याने येथील रस्त्यांचेदेखील नुकसान होत आहे. महसूल अधिकारी व कर्मचारी या उत्खननाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत. नागझरी परिसरामध्ये असलेल्या २२ ते २५ क्रशरमधून निघणाºया भुकटी व धुळीमुळे झाडापानांवर मातीचा थर साचला आहे. हवेमध्ये धुळीचे कण असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
लालोंडे ग्रामपंचायतीने सन २०१० पासून लोकवस्तीमध्ये असणाºया खदानी बंद कराव्यात यासाठी ठराव घेऊन खदानी गौण खनिज विभाग, महसूल विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असून त्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अनेकदा महसूल विभागाकडे केली आहे. लालोंडे गावातील सव्र्हे क्रमांक २२८ मध्ये मोठ्या प्रमाणात खदानी असून दररोज त्या ठिकाणाहून १०० गाड्यांपेक्षा अधिक दगडाचे उत्खनन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तक्रारींकडे महसूल तसेच खनिकर्म विभाग दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.
नियम काय?
’ खाणपट्टेदारांनी प्रत्येक पायरीची उंची दीड मीटरपेक्षा अधिक आणि रुंदी उंचीपेक्षा कमी असणार नाही याची दक्षता घ्यावी.
’ खाणीचा पृष्ठभाग कठीण खडकाने बनलेला असेल तर खाणीचा उतार क्षितिजसमांतर रेषेपासून ६० अंशापेक्षा जास्त नसेल अशा कोनात असावा.
’ खाणीचा पृष्ठभाग पायºयाच्या स्वरूपात असेल. कोणत्याही पायरीची उंची सहा मीटरपेक्षा जास्त असणार नाही आणि तिची रुंदी उंचीपेक्षा कमी असणार नाही याची दक्षता घ्यावी.
लालोंडे, नागझरी व परिसरात असणाºया खदानीबाबत तक्रारी प्राप्त आहेत. ड्रोनच्या साहाय्याने तांत्रिक पद्धतीने या ठिकाणी असणाºया खदानींचे मोजमाप करण्यात आले आहे. संबंधित खाणपट्टेधारक यांच्याकडून त्यांच्याकडे असणाºया गौण खनिज शुल्क भरल्याचा तपशील मागवण्यात आला आहे. त्यामध्ये तफावत आढळल्यास संबंधितांकडून अतिरिक्त रॉयल्टी भरून घेण्यात येईल. नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्यात येईल. -संदीप पाटील, जिल्हा जिल्हा खनिकर्म अधिकारी.