पालघर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीकरिता नागरिकांनी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली असून पूजेच्या साहित्यासोबतच नववर्षाच्या मुहूर्तावर सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन व घर घेण्याकडे देखील नागरिकांचा कल दिसून येत आहे.
गुढीपाडवा जवळ आल्याने पालघरमध्ये खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. साखरेच्या माळा, कलश, मिनी गुढी, फुल, तोरण यांसारख्या वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. यासह अनेक नागरिक या शुभमुहूर्तावर वाहन, घर खरेदी करणे, पूजा करणे व लग्नाचे मूहुर्त ठरवत असतात. दसरा दिवाळी सारखेच गुढीपाडव्याच्या दिवशी देखील सोने चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी करण किंवा बुकिंग करणे यासह गृहप्रवेश किंवा टोकन देऊन घर बुक करण्याकडे देखील नागरिक पसंती दिसत आहे.
बाजारांमध्ये गुढी करिता साखरेच्या माळा आणि कलश यांसारख्या धार्मिक वस्तूंना मागणी वाढली आहे. नवा ट्रेंड नुसार घर सुशोभनासाठी मिनी गुढीची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सवलतींवर सवलती
दुकानातील वस्तूंच्या विक्री जोरात व्हाव्या या दृष्टीने दुकानांमध्ये नागरीकांना सवलतींचे प्रलोभन देण्यात येते. त्यामुळे नागरिक आकर्षित होऊन खरेदी कडे वळतात. यंदा देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदीसाठी अनेक ऑफर येत आहेत, त्यामुळे रिअल इस्टेटमध्येही खरेदीला वेग आला आहे. यामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फ्लॅट खरेदी केल्यास 5 ग्रॅम सोन्याचा ऑफर देखील दिला जात आहे. तर काही कंपन्या मॉड्यूलर किचन ऑफर करत आहेत.
छोट्या गुढींचा ट्रेंड
मराठी नववर्षानिमित्ताने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षानुवर्षे रुजली आहे. उंच गुढी उभारण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये कायम असली तरी, वाढत्या गृहसंकुलांमुळे आणि जागेच्या मर्यादेमुळे सहा इंचा पासून तीन फुटांपर्यंतच्या तयार गुढी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लहान आकाराच्या गुढींना अधिक पसंती मिळत आहे. या तयार गुढींच्या किमती १०० ते २५० रुपयांपर्यंत असल्याचे दिसून येत आहे.