|| निखिल मेस्त्री
किरकोळ बाजारपेठेत अपेक्षित उठाव नाही; बचत गटाच्या महिलांकडेही आगाऊ नोंदणी अल्प
पालघर : पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे विविध वस्तुंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी यंदा किराणा सामानाच्या दुकानांवर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत. आहे.
ग्रामीण भागात बहुतांश कुटुंबांमध्ये फराळ तयार केला जातो. परंतु, करोना काळापासून आर्थिक गणित कोलमडण्याबरोबरच सध्याच्या महागाईमुळे अनेक गृहिणींचा कल मर्यादित स्वरूपात घरी फराळ तयार करण्याकडे दिसून येत आहे. परिणामी किराणा सामानाच्या दुकानांमध्ये दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसांची खरेदी करण्याकडे ग्राहकवर्ग अल्प प्रमाणात येत आहे. त्यामुळे किराणा बाजारात मंदीचे वातावरण आहे.
करोना काळात निर्माण झालेली मंदीची झळ अजूनही कायम राहिल्याने दिवाळीच्या अनुषंगाने किरकोळ बाजारपेठेत अजूनही अपेक्षित उठाव आलेला नाही. त्यातच फराळासाठी लागणाऱ्या बेसनपासून ते सुकामेवा पर्यंतची सामग्री ३० ते ४० टक्के महागल्याने पूर्वीसारखी विक्री होत नसल्याचे किराणा मालक दुकानदार सांगत आहेत. किराणा दुकानदार यांच्याकडे मिळणारे सामान ऑनलाइन विक्रीद्वारे आणखीन स्वस्त असल्यामुळे काही कुटुंबांचा ऑनलाईन विक्रीद्वारे सामान खरेदी करण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदी कमी प्रमाणात होत असल्याचे दुकानदार सांगत आहेत.
दिवाळीच्या तोंडावरच महागाईसह ऑनलाइन विक्री, नवनवीन मॉल्स यामुळे किराणा दुकानदार संकटात आहेत. सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत असल्यामुळे मर्यादेतच किराणा सामानाची खरेदी विक्री होत आहे. ग्राहकांची संख्या कमी होत आहे. दिवाळीत आमच्यावर संक्रांत ओढवते की काय अशी भीती आहे. – सवाराम चौधरी, अध्यक्ष, रिटेल किराणा माल असोसिएशन, पालघर