नीरज राऊत
गेल्या काही वर्षांपासून चक्रीवादळ, अवेळी पडणारा पाऊस तसेच पावसाची अनियमिततेमुळे भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात असली तरीही झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी रक्कम तुटपुंजी ठरत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक भात पिकाऐवजी इतर नगदी पिकांकडे वळण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
पालघर जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. असे असले तरीही वातावरणातील बदल, पावसाच्या अनियमितता तसेच चक्रीवादळामुळे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्ण हंगाम मशागत केल्यानंतर देखील अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठय़ा नुकसानीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. शिवाय उत्पादित होणारे भात हे अधिकतर कौटुंबिक वापरासाठी पिकवले जात असून भातपीक मशागतीवर होणारा खर्च त्यातून मिळणारे उत्पन्न या सर्व गोष्टींचा ताळमेळ पाहिला तर बाजारातून तांदूळ विकत घेणे अधिक किफायतशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने भात लागवड करणे बंद केले आहे.
शासनाने आदिवासी बांधवांना दिलेल्या वनपट्टय़ाच्या ठिकाणी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन अशा पट्टय़ांमध्ये मजगी करून भात पिकाचे क्षेत्र वाढण्यास हातभार लागला आहे. तरीही सुपीक मातीच्या थराची मजगी करताना उलथापालथ होत असल्याने भाताच्या उत्पादकतेवर मर्यादा आल्याचे दिसून आले आहे. सुधारित वनाची लागवड करताना दोन भात रोपांमध्ये ठेवायचे अंतर राखले जात नसल्याने तसेच खताचा गरजेपेक्षा अधिक वापर केला गेल्याने भातपिकाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक शेतकरी भात लागवड हे जणू आपले वार्षिक कार्य असल्याप्रमाणे लागवड करीत असून हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन तसेच शेतीमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यास निरुत्साह दाखवत आहेत. त्यामुळे अपेक्षित उत्पादन व उत्पादकता मिळत नाही. काही ठिकाणी उच्च प्रतीचा भात लावल्यानंतर देखील चांगल्या दर्जाचा तांदूळ मिळत नसल्याने शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या भात संकलन केंद्रांमधून जमा होणारा भाताचा दर्जा हा अत्यंत सुमार असल्याने त्याची पुनर्विक्री होण्यास मर्यादा येत आहे.
जिल्ह्यातील वाडा तालुक्याचा अपवाद वगळता इतर तालुक्यात विक्रीयोग्य अधिशेष असणारे भाताचे उत्पादन घेतले जात नाही. शिवाय भातशेती मधील जोखीम घटक वाढत चालल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये शेती करण्याबाबत निरुत्साह आला आहे. भात उत्पादनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगानंतर व्यवहारार्थ मॉडेल तयार झाली असली तरी त्याचा प्रचार व प्रसार करण्यास कृषी विभागाने विशेष उत्सुकता दाखविली नसल्याने अजूनही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात उत्पादन घेत आहेत. भातपिकाची मर्यादित उत्पादकता, निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान, मनुष्यबळाची समस्या या बाबींवर भातपीक उत्पादनाऐवजी इतर नगदी पिकांची लागवड करण्याची पसंदी काही भागातील शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या करून दाखवली आहे.
चिंचणी येथील रामचंद्र सावे व कुटुंबीयांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरची लागवडीकडे लक्ष केंद्रित करून मिरची उत्पादनाचे अद्यावत तंत्रज्ञान विकसित केले आहे. तिखट मिरची, शिमला (ढोबळी), आचारी, ओमेगा, ज्वेलरी व सितारा अशा विविध प्रकारच्या मिरच्यांचे उत्पादन चिंचणी व वाणगाव पट्टय़ात घेतली जात असून या पिकाला बाजारपेठ सहज उपलब्ध असल्याने येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कधीच उपस्थित राहिला नाही. विशेष म्हणजे या भागातील उच्चशिक्षित तरुणवर्ग शेतीकडे वळला आहे. त्याचबरोबर लहान व मध्यम शेतकऱ्यांना भात पिकाचे क्षेत्र कमी करून त्यामध्ये मिरची, कारली, काकडी, वांगी, दुधी, भोपळा, शिराळा, पडवळ, गवार, भेंडी, आळू अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड करून त्याची स्थानीय बाजारपेठांमध्ये विक्री केल्याने त्यांना देखील या बदलामध्ये काही प्रमाणात स्थैर्य प्राप्त झाले आहे.
चिंचणीसह डहाणू तालुका व पालघर तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी बागायतीकडे लक्ष केंद्रित केले असून भाजीपाला लागवड सध्या किफायतशीर ठरू लागली आहे. आगामी काळात ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी मिरची व भाजीपाला लागवड तर पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, अशा ठिकाणी फळशेती क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्ह्यात आंबा, चिकू, जांभूळ, काजू, पपई, कलिंगड व पेरूची लागवड नव्याने होताना दिसून येत आहे. अनेक खाजण व निमखाऱ्या पाण्याचे स्रोत्र असलेल्या ठिकाणी शेततळी निर्माण करून तसेच पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करून शेततळ्यामध्ये शिंगाडय़ाच्या लागवडीसह मत्स्यशेती करण्याचे प्रयोग देखील यशस्वी ठरले आहेत.
पालघर जिल्ह्यामध्ये पूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या केळीचे उत्पादन घेतले जात असते मात्र नंतर केळ्यावरील रोगाचे प्रमाण वाढल्याने केळी लागवडीकडे बागायतदारांनी पाठ फिरवली. बाजारात सध्या मोठी मागणी असणाऱ्या सफेद वेलची केळ्याची लागवड पालघर जिल्ह्यात करण्यासाठी शासनाने प्रोत्साहित केल्यास बाजारपेठेजवळ असणाऱ्या या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील यात शंका नाही. जिल्ह्यात खाजरी (खजूर), शिंदी लागवड तसेच फळ व अन्नधान्य प्रक्रिया केंद्र उभारणीकडे काही मंडळींचा कल आहे. तरी झपाटय़ाने नागरीकरण होणाऱ्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात बाजारपेठ सहजगत्या उपलब्ध होत असल्याने नाशिवंत उत्पादने घेऊन नगदी पिकावर भर देण्याची येथील शेतकरी तसेच कृषी विभागाची गरज आहे.