लोकसत्ता वार्ताहर
कासा : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पूर्वी सिंचनाच्या सुविधा मर्यादित उपलब्ध असल्याने केवळ खरीप हंगामातील पावसाच्या पाण्यावरील भात शेतीचा आधार होता. मात्र सध्या फक्त भात शेतीवर अवलंबून न राहता आदिवासी भागातील तरुण सुशिक्षित शेतकरी भाजीपाला, फुलशेती, फळ लागवड करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे. धरणातील कालव्याच्या पाण्यासोबतच विहिरी, तलाव, नदी यामधून कृषी पंपाच्या सहाय्याने पाण्याची सोय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये चांगले उत्पन्न मिळवीत आहे.
पालघर जिल्ह्यात जवळपास २२८० हेक्टरवर भाजीपाला लागवड केली जात आहे. शेतकरी आपल्या शेतात भातासोबतच आता जोडपीक म्हणून गवार,भेंडी, दुधी, कारले, चवळी तसेच हिरव्या पालेभाज्या यांची पिके घेतात. शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला डहाणू, बोईसर, पालघर, सफाळे, कासा, मनोर, जव्हार अशा प्रमुख ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येतात. या ठिकाणी स्थानिक आदिवासी युवक बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला शेतकऱ्यांना देऊन घेतलेला भाजीपाला ऑनलाइन तसेच वृत्तपत्रात येणारे बाजारभाव पाहून पुणे, वाशी सुरत या ठिकाणी पाठवतात. सध्या हिरव्या मिरचीला ६० किलोपर्यंत भाव मिळत आहे तर गवारला ४० ते ४५ रुपये इतका भाव मिळतो.
भाजीपाला शेतीतून शेतकरी तसेच भाजी व्यापारातून युवकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी या ठिकाणी दररोज साधारणपणे २० ते २२ क्विंटल गवार, १० ते १२ क्विंटल भेंडी, पाच सहा क्विंटल दुधी, तसेच दोन ते अडीच क्विंटल हिरवी मिरची, व इतर हिरव्या पालेभाज्या हे तरुण विकत घेतात. घेतलेला भाजीपाला पाच ते सहा टेंपोच्या माध्यमातून वाशी, पुणे व सुरत येथील घाऊक बाजारपेठेत पाठवला जातो.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो केवळ पावसाच्या पाण्यावरच शेती केली जात असायची. परंतु आता पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पातून डहाणू आणि पालघर तालुक्यात बऱ्याच गावांना कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने पारंपारिक भात शेती सोबतच येथील शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळला आहे. जव्हार, तलासरी तसेच डहाणू तालुक्यातील पेठ, धामटने, कोल्हान, निकने, गंजाड, वाघाडी या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळला आहे. भेंडी, गवार, दुधी, हिरवी मिरची, टोमॅटो तसेच पालेभाज्या ची पिके शेतकरी घेतात.
जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतरही काही प्रमाणात कमी झाले आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर एक पीक घेऊन शहरी भागात जाणारे अदिवासी शेतकरी आता बारमाही शेती करू लागले आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत ट्रॅक्टर , विहीर , ठिबकसिंचन अशा आधुनिक साधनांचा ही अनेक शेतकरी उपयोग करत आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी तत्कालीन आमदार श्रीनिवास वणगा व माजी आमदार अमित घोडा यांनी स्थानिक युवकांना प्रोत्साहन देत महालक्ष्मीगड शेतकरी उत्पादक गट सुरू केला होता. या गटाच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांचा भाजीपाला वाशी, सुरत, पुणे अशा ठिकाणी पाठवत होते. परंतू इतर व्यापारी भाजीपाला खरेदी करून रोख पैसे देत असल्याने शेतकऱ्यांनी गटाकडे भाजीपाला विकणे जवळपास बंद केले आहे. त्यामुळे एकेकाळी शेतकऱ्यांना भरघोस माल विकून देणारा महालक्ष्मीगड शेतकरी उत्पादक गट बंद संकटात सापडून बंद होण्याच्या स्थितीत आहे. प्रत्येक तालुका स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय शासनाने लवकरात लवकर अमलात आणण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.