वाडा : यंदा हवामान खात्याने लवकर पावसाचा अंदाज वर्तवल्याने कृषी सेवा केंद्र आणि कृषी विभागाच्या भात बियाणे वाटप केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र या केंद्रांवर योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.
मान्सूनपूर्व कामे संपवून तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी बी-बियाणे खरेदीसाठी कामाला लागला आहे. वाडा, विक्रमगड या दोन तालुक्यांत जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित, हायब्रीड वाणांची शेतकऱ्यांची अधिक मागणी असते. विशेषत: वाडा तालुक्यात वाडा कोलम, झिनी या वाणाच्या बियाणाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे.
मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत केली असून आता ते खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत.
जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाने तालुका पंचायत समिती स्तरावर भात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. त्याचे वाटप करण्यात येत आहे. कर्जत- ३, कर्जत- ५, रत्नागिरी- ६, रत्नागिरी- ८ या चार वाणांचे एकूण ५२० िक्वटल भात बियाणे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. गेल्या चार दिवसांत दोन हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांनी साडेतीनशे क्विंटल भात बियाणे खरेदी केले आहे. तर विक्रमगड तालुक्यात सोमवापर्यंत भात बियाणेवाटप सुरू करण्यात आलेले नव्हते, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान भात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी खासगी कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. येथे दप्तरी, समृद्धी, रुपाली, सुवर्णा, जोरदार या संकरित वाणांबरोबर वाडा कोलम, झिणी, जया या वाणांना अधिक मागणी दिसुन येत आहे. या वाणांची सरासरी किंमत १० किलो बॅगसाठी ८५० ते ९०० रुपयांपर्यंत आहे. यावर्षी भात बियाणांच्या किमती वाढल्या नसल्या तरी खते, औषधे यांच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे.
कृषी विभागामार्फत डहाणू पंचायत समितीमध्ये चार दिवसांपूर्वी ५० टक्के अनुदानात बी बियाणे वाटप करण्यात आले. परंतु कासा, चारोटी, सायवन, बापगाव, दाभाडी येथील शेतकऱ्यांना येथे येणे शक्य नाही. कारण बियाणाची ने-आण करण्यासाठी लागणारा प्रवासखर्चच अनेकांना परवडत नाही. अनेक शेतकरी त्यामुळे नाइलाजाने आपल्या जवळच्या कृषी केंद्र दुकानातून चढय़ा भावाने बी बियाणे खरेदी करत आहेत. सध्या बियाणाच्या १०किलोच्या पिशवीसाठी आठशे ते हजार-बाराशेपर्यंत रक्कम मोजावी लागत आहे. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यांच्या किमतीत तर १५ ते २५ % वाढ झाली आहे. सध्या कर्जत ३, सिंधू, कावेरी, रासी, पूनम आणि सुंदर या जातीच्या बियाणांना मागणी जास्त आहे, असे शेतकरी म्हणाले. दरम्यान ग्रामीण भागातून कासा बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्याला ही बियाणे घरापर्यंत वाहून नेण्यासाठी मालवाहू वाहनाची गरज असते. त्यामुळे या वाहनांची आणि चालकांची सध्या चलती दिसते आहे.
आतबट्टय़ाचा व्यवहार
जिल्ह्यातील येथील संपूर्ण भातशेती व्यवसाय नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे, निसर्गाने साथ दिली तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरत असतो, नाहीतर या व्यवसायाकडे आतबट्टय़ाचा व्यवसाय म्हणूनच बघितले जाते. आता खते, औषधे, बियाणे, अवजारे याबरोबरच मजुरी खर्च वाढला आहे. शिवाय कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.
दरवर्षीप्रमाणे पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात यावे लागते. खरे तर महागाईमुळे शेती फार
त्रासदायक ठरत आहे. नांगर, ट्रॅक्टर, मजूर, खत सारेच भाव वाढले आहेत. शेतीशिवाय दुसरे कामही नाही. त्यामुळे मग शेतीला पर्याय नाही. — नंदकुमार रावते, शेतकरी, देह्याले गाव
जिल्ह्यातील भातशेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या मजुरी खर्चाने हा व्यवसाय संपुष्टात येईल. — पुंडलिक पाटील, शेतकरी, मानिवली, ता. वाडा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा