शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

रमेश पाटील

वाडा : भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या वाडा तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून मोठय़ा कष्टाने भाताचे उत्पादन घेतो, मात्र या भाताची खरेदी शासनाकडून वेळेवर होत नसल्याने येथील शेतकऱ्यांची ऐन दिवाळीत आर्थिक कोंडी होत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत व एकाधिकार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भात, नाचणी, वरई याची पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांत विविध भात खरेदी केंद्रांच्या माध्यमातून खरेदी केली जाते.

ही खरेदी दसऱ्यापासून सुरू केली तर शेतकऱ्यांचा सर्वात मोठा व आनंदाचा असलेल्या दिवाळी सणातील आर्थिक कोंडी दूर होईल. मात्र महामंडळाकडून ही खरेदी वेळेत केली जात नाही. दिवाळी होऊन पाच दिवस झाले तरी अजूनपर्यंत एकही भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तात्काळ भात खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

प्रादेशिक कार्यालय, आदिवासी विकास महामंडळ जव्हारअंतर्गत ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यंत विविध ठिकाणच्या भात खरेदी केंद्रांवर एकाधिकार व आधारभूत या दोन वेगवेगळ्या पद्धतीने भात खरेदी केली जाते. मात्र ही खरेदी सुरू न झाल्याने व आर्थिक संकटांमुळे काही शेतकऱ्यांनी अल्प दराने खासगी व्यापाऱ्यांना भात विकून आपली गरज भागवली. भाताला गतवर्षी १८६० रुपये प्रति क्विंटल दर व ७०० रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) असे एकूण २५६० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला होता. वाडा तालुक्यात गतवर्षी सहा ठिकाणी महामंडळाने भात खरेदी केंद्रे सुरू केली होती. यावर्षी ही संख्या वाढवावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

फक्त ९२ रुपयांनी दरात वाढ

गतवर्षीपेक्षा या वेळी केंद्र सरकारने भाताच्या दरात फक्त प्रति क्विंटलला ९२ रुपयांनी वाढ केली आहे. बियाणे, खते, औषधे, अवजारे व मजुरी खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊनही केंद्र सरकारने भाताचा भाव अवघा ९२ रुपयांनी वाढवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आघाडी सरकारने सानुग्रह अनुदान प्रति क्विंटलला ५०० रुपयांनी वाढवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बारदानाची टंचाई असल्याने खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. लवकरच भात खरेदी केंद्र सुरू  होतील.

– विजय गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, जव्हार

येथील उत्पादन खर्च विचारात घेऊन भात खरेदीचा दर ठरविण्याची आवश्यकता आहे.

– दत्तात्रेय पटारे, शेतकरी, रा. तिळगांव, ता. वाडा