वाडा: पुरुषाच्या पावलावर पाऊल ठेवून महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठरत आहेत. तसेच कुठल्याही कठीण प्रसंगात ती मागे रहात नाही, शनिवारी १६ सप्टेंबर रोजी डोंबिवली (आजदेगांव) येथील शाम सुकाळे यांचे निधन झाले, त्यांना तीन मुलीच, अशा प्रसंगात या तीन मुली आणि काकांनी पार्थीवाला खांदा देत पार्थिव स्मशानभूमीत नेले. व वडिलांच्या पार्थिवालाही त्यांनीच अग्निडाग सुद्धा दिला.
दोन दिवसांपूर्वीच तारापूर येथील एका मातेने तिसरी मुलगी झाली म्हणून सहा दिवसांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली असताना दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून आजाराशी झुंज देणा-या आपल्या वडिलांची सेवा तर केलीच पण वडिलांच्या निधनानंतरही या मुलींनी पार्थिवाला खांदा देणे, स्मशानभूमीत जाऊन अग्निडाग देणे हे सर्व सोपस्कार पार पाडून वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
वाडा तालुक्यातील मुळ खैरे आंबिवली येथील रहिवासी असलेले शाम सुकाळे (वय ६३ वर्ष) यांचे आज शनिवारी डोंबिवली येथे निधन झाले. गेले अनेक वर्षांपासून ते कामानिमित्त डोंबिवली येथे रहात असल्याने त्यांचा अंत्यविधी डोंबिवली येथेच करण्याचा निर्णय घेतला. त्यांना तीन मुलीच असल्याने त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याची मोठी जबाबदारी सोनाली, स्नेहल, व श्रद्धा या तीन मुलींवर होती. त्यांनी आपल्या आईला धीर देत ही मोठी जबाबदारी पेलली. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मदत करून सहकार्य केले.