रमेश पाटील
वाडा : खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बियाणे, खते, औषधांची खरेदी करण्यासाठी जवळपास असलेल्या खासगी कृषी सेवा केंद्रांमध्ये धाव घेत आहे, मात्र कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया, सुफला ही खतेच गायब झाली आहेत. शासनाने पुरवठा बंद केल्याने खते नाहीत असे कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
खरीप हंगामात पालघर जिल्ह्यात भात हे एकमेव पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. भातपिकामध्ये नवनवीन आलेल्या संकरित वाणांमुळे रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. जंगल संपत्ती कमी झाल्याने जंगलातून पावसाळय़ात शेतजमिनीत वाहुन येणारा पाला-पाचोळा येणे बंद झाले आहे. गुरेढोरे संख्या ९० टक्क्यांनी कमी झाल्याने सेंद्रीय खतेही कमी झाली आहेत. त्यामुळे येथील सर्वच शेतकऱ्यांना भातशेतीसाठी युरिया, सुफला या रासायनिक खतांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
मोसमी पावसापुर्वी शेतीची बांधबंदिस्ती, राब भाजणी ही कामे करून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी केली आहेत. खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर हेलपाटे मारत आहे, मात्र युरिया, सुफला या खतांचा पुरवठा गेले अनेक दिवस राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना करण्यात आलेला नाही. शासनाने संबंधित कंपनीला ही रासायनिक खते पुरवठा करण्यावर निर्बंध घातल्याने कंपनीने पुरवठा करणे बंद केले असल्याचे सांगितले जात आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामात पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३०१६ मेट्रिक टन युरिया व सुफला ही रासायनिक खते पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र काळाबाजार रोखण्यासाठी या खतांचा पुरवठा सध्या करू नये, असा आदेश शासनाने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनीला केल्याने या कंपनीने कृषी सेवा केंद्रांना सध्या पुरवठा करणे बंद केले आहे. सध्या जिल्ह्यात १२० हुन अधिक परवानाधारक कृषी सेवा केंद्रे आहेत. यामधील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये १९०० मेट्रिक टन इतका खतांचा साठा शिल्लक असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. काही वितरकांकडे (डिलर) २०० मेट्रिक टन व संरक्षिक साठा ७०० मेट्रिक टन असा एकूण ९०० मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहे.
अनेक वितरकांकडे व कृषी सेवा केंद्रांकडे गेल्या आठ दिवसांपासून या खतांचा साठा संपलेला आहे. यामुळे खत खरेदी करण्यासाठी बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत संरक्षित साठय़ातीत खते विक्रीस शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी कुडूस, ता. वाडा येथील किरण अॅग्रोचे वितरक किरण पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनीला अनुदानित खते पुरवठा करण्यावर शासनाचे निर्बंध घातल्याने खतपुरवठा बंद आहे.
– प्रकाश राठोड, मोहीम अधिकारी, पालघर
काही रासायनिक कंपन्यांमध्ये खतांच्या होत असलेल्या काळय़ाबाजाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
– रामचंद्र पष्ट, शेतकरी, निचोळे, ता. वाडा