कासा : आदिवासी विकास महामंडळाच्या डहाणू तालुक्यातील घोळ येथील धान खरेदी केंद्राच्या गोदामाला अज्ञात व्यक्तीने आग लावण्यात आल्याने २००० क्विंटल पेक्षा अधिक धान या आगीत जळून खाक झाले आहे. आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करत असून हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय या भात खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास घोळ येथे आदिवासी विकास महामंडळाचे धान्य खरेदी केंद्र याला आग लागल्याची माहिती घोळ येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी सूर्यवंशी गोदाम पाल यांना फोन द्वारे दिली.
गोदामपाल अभिजीत सूर्यवंशी हे घटनास्थळी पोहोचून सुरुवातीला कुपनलिकेतील पंपाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणात येत नसल्यामुळे कासा पोलिसांनी अग्निशमन डहाणू येथील अदानी औष्णिक ऊर्जा केंद्र आणि तारापूर एमआयडीसी येथून अग्निशमन दलाला पाचारण केले. या दोन्ही दलाच्या चार अग्निशमन गाड्या आग विझविण्याचे काम करत असून अजूनही गोदामात आग धुमसत आहे.
या धान खरेदी केंद्रात ३२०० क्विंटल धान (न भरडलेले भात) असल्याची माहिती अभिजीत सूर्यवंशी यांनी दिली. सात तास उलटूनही आग धुमसत असल्यामुळे उत्खनकाद्वारे द्वारे गोदामा मधील भात काढायचे काम सुरू आहे. या आगीमध्ये गोदामा मधील निम्म्यापेक्षा जास्त भात हा जळून खाक झाला असून उर्वरित धान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
धान खरेदी केंद्रावर असणारा सुरक्षा रक्षक केंद्रातील कामानिमित्त बाहेर गेला असल्यामुळे ही नेमकी आग कोणी लावली याबाबत कसा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान गोदाम पाल अभिजीत सूर्यवंशी यांना विचारले असता ही आग गोडवान च्या पाठीमाच्या भागा असणाऱ्या भिंतीमधील फटी मधून लावण्यात आली असावी असे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.