डहाणू: डहाणू तालुक्यातील रानशेत आणि विवळवेढे गावाच्या मधील प्रसिद्ध महालक्ष्मी गडाला (मुसळ्या डोंगराला) शुक्रवार ७ मार्च पासून लागलेली आग आटोक्यात न आल्यामुळे आग वाढून डोंगरावरील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात पोहोचली असून आगीत महालक्ष्मी मंदिर परिसरातील दुकाने जळून खाक झाली आहेत.
डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर (मुसळ्या डोंगर) शुक्रवार पासून मोठा वणवा लागला होता. वनविभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र डोंगरावरील जंगलाचा परिसर मोठा असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली असून आग नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान शनीवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग मंदिर परिसरातील पोहोचली असून यामध्ये परिसरातील १४ दुकाने जळून खाक झाली आहेत.
डोंगरातील वणाव्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानांमध्ये दुकानदारांचे विक्रीसाठी ठेवण्यात येणार साहित्य जळाले असून दुकानदारांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर वनविभागाकडून सातत्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असून मनुष्यबळ आणि अपुऱ्या साधनांमुळे आग आटोक्यात आनणे कठीण होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
डोंगरावर शुक्रवार पासून वणवा लागला होता. आम्ही याविषयी वनविभागाला सूचना दील्यांनंतर वनविभाग कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना आग विझवण्यात यश मिळाले नाही. आगीत आमची दुकाने जळून खाक झाली असून आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. – राजेश बोलाडा, स्थानिक दुकानदार
महालक्ष्मी गडावर (मुसळ्या डोंगरावर) आग लागल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परिसरात मोठा असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आग वाढून मंदिर परिसरात पोहोचली होती. आमच्या परीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. – सुजय कोळी, वनक्षेत्रपाल वनविभाग कासा