कुणाल लाडे
डहाणू नगरपरिषद हद्दीत शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल, पेट्रोल पंप, औद्योगिक वसाहत, विशेष इमारती व इतर आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास येत आहे. नवनियुक्त नगर अग्निशमन अधिकाऱ्यांनी याविषयी कठोर पावले उचलली असून शहरातील ६६ आस्थापना धारकांना अग्निप्रतीबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले जात आहेत.
डहाणू नगरपरिषद मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नगर अग्निशमन अधिकाऱ्याची जागा रिक्त असून फेब्रुवारी २०२३ मध्ये याठिकाणी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी नंतर नगरपरिषद हद्दीतील आस्थापनांमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची तपासणी सुरू झाली असून आस्थापना धारकांना नोटीस द्वारे अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात गेल्या काही वर्षात काही किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यावर नगरपरिषद अंतर्गत असलेल्या अग्निशामक दलाच्या वतीने नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच शहरातील छोट्या भागातील दुर्घटना रोखण्यासाठी नगरपरिषद अंतर्गत छोटे अग्निशामक वाहन उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती नगरपरिषद मार्फत देण्यात येत आहे.
हेही वाचा >>> पालघर नगर परिषदेने मंजूर केली तिप्पट किंमतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची निविदा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
नगर अग्निशमन विभागामार्फत सध्या आस्थापनांची तपासणी सुरू असून आत्तापर्यंत २० रुग्णालय, ८ हॉटेल, ८ शाळा/महाविद्यालय, २० कारखाने, ४ पेट्रोल पंप, २ गॅस एजन्सी आणि ४ सभागृहांची तपासणी करण्यात आली असून यातील काही ठिकाणी यंत्रणा कार्यान्वीत असल्या तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अग्निप्रतीबंधक यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वीत करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी नोटीस बजावण्यात आली असून १२० दिवसांच्या आत उपाययोजना न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मोजक्याच ठिकाणी अग्निप्रतीबंधक उपाययोजनांची तपासणी नगरपरिषद हद्दीत अनेक हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने असून सत्ता पर्यंत मोजक्याच ठिकाणी अग्निप्रतीबंधक उपाययोजनांची तपासणी केल्याचे दिसून येत आहे. नगर अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रथमतः मुख्य बाजारपेठेतील आस्थापणांना सूचना देण्याचे काम सुरू असून लवकरच नगरपरिषद हद्दीतील इतर ठिकाणी तपासणी सुरू करण्यात येणार असून शहरातील आस्थापना धारकांनी अग्निप्रतीबंधक उपाययोजना करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती नगरपरिषद मार्फत देण्यात आली आहे.