पालघर : पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि कामगार वर्गासाठी एक ऐतिहासिक निर्णय मंत्रालयात घेण्यात आला. तारापूर औद्योगिक वसाहती लगत असणाऱ्या कुंभवली गावातील सर्वे क्र. १७७५/५७ या जागेवर १५० खाटांचे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण रुग्णालय प्रकल्पासाठी लागणारी जमीन राज्य शासन १ रुपया नाममात्र शुल्कावर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

९ एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत प्रस्तावित कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयासाठी कुंभवली येथील जमीन १ रुपया नाममात्र दरात हस्तांतरित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थित सर्व संबंधित विभागांनी रुग्णालयासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा हे गेल्या १० महिन्यांपासून तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे गेल्या दोन वर्षापासून या रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. खासदार महोदयांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील कामगारांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी व इतर संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.

या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट होणार असून सामाजिक पुनर्वसन प्रक्रियेसही गती मिळणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे हाल

तारापूर औद्योगिक वसाहत आशिया खंडातील सर्वात मोठी उद्योग नगरी असून या ठिकाणी १४५० पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत. कामगारांना भेडसावणाऱ्या सर्वसामान्य आरोग्याच्या समस्या तसेच अपघात समय लागणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना मुंबई, ठाणे अथवा गुजरात राज्यात हलवावे लागते. तसेच पालघर जिल्ह्यात सामान्य रुग्णालय सुरू नसल्याने अनेकदा येथील कामगारांना खाजगी दवाखाने अथवा रुग्णालयात उपचार घेणे भाग पडते. त्यामुळे आर्थिक नुकसानीसह मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

तारापूर औद्योगिक वसाहती मधील कामगारांच्या वेतनातून इएसआयसी च्या हप्त्याची कपात होत आहे. मात्र जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय नसल्याने या योजने अंतर्गत उपचार घेण्यासाठी कामगाराला मुंबईला जावे लागत असे. बोईसर कुंभवली येथे रुग्णालयासाठी जागा उपलब्ध झाल्याने पुढील काही वर्षात बोईसर परिसरातील नागरिकांना व कामगारांना दर्जाचे वैद्यकीय उपचार सेवा उपलब्ध होणार आहे.