खराब हवामानामुळे रविवारपासून नौका समुद्रात नेण्याबाबत संभ्रम

पालघर :  गेल्या दोन महिन्यांपासून पावसाळ्यातील मासेमारी बंदी उठण्याची प्रतीक्षा करत असलेल्या मच्छीमार समुदायाला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एक ऑगस्टपासून अधिकृतपणे मासेमारी हंगामाला सुरुवात होत असली तरी, हवामान खात्याने वर्तवलेल्या खराब हवामानाच्या अंदाजामुळे नौका समुद्रात नेता येणार की नाही, याविषयी मच्छीमारांमध्ये संभ्रम आहे. याबाबत शासकीय स्तरावर अधिकृत सूचना जारी करण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी एक जूनपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू होतो. दोन महिन्यांचा हा कालावधी संपल्यानंतर एक ऑगस्टपासून मच्छीमार समुद्रात नौकांसह प्रयाण करतात. पष्टिद्धr(१५५)म किनारपट्टीवर एक ऑगस्टपासून मासेमारीचा कालावधी सुरू होणार असला तरी खराब हवामान मानाचा अंदाज गृहीत धरून काही मच्छीमार संस्थांनी पाच ऑगस्टपासून मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मच्छीमारांनी स्वत:च्या जबाबदारीने व जोखमीने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवार संध्याकाळपर्यंत कोणताच हवामान अंदाज वर्तवला नसल्यामुळे मच्छीमारांना मध्ये मोठी संभ्रमावस्था आहे.

ऑगस्टमध्ये प्रत्यक्षात मासेमारी सुरू होत असली तरी त्याच्या एक महिन्या आधीपासूनच नौकांवरील जाळी आणणे,दुरुस्त करणे, विणणे, नौकांची डागडुजी, नौकांच्या यंत्राची दुरुस्ती, नौकांची रंगरंगोटी, खलाशांची जमवाजमव, शीतपेटय़ा आदी कामे मच्छीमार समाज मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये करीत असतो. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या मासेमारी हंगामात खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौका सुरुवातीच्या टप्प्यात मासेमारीसाठी जातात. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ात लहान टप्प्याच्या मासेमारीला प्रारंभ होतो. लांब टप्प्याची मासेमारी ही १० ते १५ दिवसांची असते. पहिल्या टप्प्याच्या मासेमारी हंगामात चांगले मासे हाताला मिळत असले तरी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे यंदा हा टप्पा लांबण्याची चिन्हे आहेत. सातपाटी गावातील सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्थेसह इतर संस्थांनी त्यांच्याकडील असलेल्या नोंदणीकृत मच्छीमारांना पाच ऑगस्टपासून मासेमारी करण्याचा निर्णय व ठराव घेतलेले आहे.

मासेमारीसाठी खराब हवामानाचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने मच्छीमारांना इशारा दिला जात आहे. या कालावधीत मासेमारीसाठी जाऊ नये. हवामान व्यवस्थित होत नाही तोवर परवाने/टोकन देणार नाही.

– आनंद पालव, सह मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघर-ठाणे

हवामानाचा अंदाज लक्षात घेता १५ ऑगस्टपर्यंत सगळीकडे मासेमारीला प्रतिबंध केल्यास मच्छिमारांची हानी होणार नाही. मत्स्यव्यवसाय विभागाने हवामानाच्या अंदाजानुसारच परवाने द्यावेत.

– जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ