पालघर : पालघर हा ग्रामीण जिल्हा असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्यावर रुग्णवाहिका देखील उपलब्ध होत नसताना मृतदेह वाहून नेताना अनेकवेळा अडचणी येत होत्या. त्यादृष्टीने मृतदेहांची सुरक्षित वाहतूक करण्याकरिता जिल्ह्याला पाच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून पालघर ग्रामीण, बोईसर, डहाणू, जव्हार व वसई तालुक्याकरिता शववाहिन्या देण्यात येणार आहेत.

मृत व्यक्तीचे शरीर सुरक्षित आणि योग्य पद्धतीने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी शववाहिनीचा (शव वाहतूक वाहन) उपयोग होतो, ज्यामुळे कुटुंबियांची आणि समाजाची मदत होते. मात्र पालघर जिल्ह्यात अधिकतर जव्हार, विक्रमगड, मोखाडा व वाडा या भागात अपघात किंवा रुग्णाला इतरत्र हलविण्याकरिता अनेकवेळा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. तसेच मृत्यू झाल्यास मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यात येत नसल्याने अनेकवेळा मृतदेहांची फरफट होताना दिसून येते.

ग्रामीण भागात या अगोदर दुचाकीवरून मृतदेहाची वाहतूक केल्याचे देखील समोर आले होते. त्या दृष्टीने मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक शववाहिन्या दाखल झाल्या आहेत. या शववाहिनांमुळे मृतदेह घरापर्यंत सुस्थितीत येईल आणि मृतांच्या नातेवाईकांना झालेल्या दुःखाचे या शववाहिणीमुळे काही प्रमाणात का होईना सांत्वन होईल, त्यांच्या दुःखावर फुंकर घालेल अशी आशा आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शववाहिनीची आवश्यकता होती मात्र उपलब्ध नसल्याने अनेकांना गैरसोय होत असे. पालघर जिल्हा परिषदेच्या आवारात मागील आठवड्यात पाच शववाहिन्या दाखल झाल्या असून प्रत्येक तालुक्याकरिता एक शववहिनी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

शववाहिनीचे फायदे

शववाहिनीमुळे मृतदेहाची योग्य आणि सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत होईल, वाहनामुळे कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी किंवा इतर आवश्यक कामांसाठी मदत मिळेल, शवाच्या वाहतुकीसाठी हे वाहन सामाजिक नियमानुसार आवश्यक सुविधा पुरवते, हे वाहन अत्यावश्यक सेवा म्हणून काम करत असल्याने लोकांना मदत मिळते तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक किंवा शासकीय संस्थेमार्फत पुरविल्यास केल्यामुळे हे खर्चिक नसते व शवाच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या वेळेची देखील बचत या शववाहिनीमुळे होणे आता अपेक्षित आहे.

रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक करण्यात येत नसल्याने अनेकवेळा बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार करतांना वाहतुकीबाबत अडचणी येत होत्या. मात्र आता शववाहिन्या दाखल झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी

शववाहिनीमध्ये व्यवस्था

या अत्याधुनिक शववाहिनीमध्ये रुग्णालयातून मृताच्या घरापर्यंत जाण्यासाठी कितीही वेळ लागला तरी मृतदेह सुस्थितीत राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लांबच्या पल्यासाठी वातानुकूलित यंत्रणा तसेच आवश्यकता पडल्यास बर्फाच्या लादीसाठी देखील व्यवस्था केली आहे. त्यासोबत लांबच्या पल्यात मृताचे नातेवाईक देखील या शववाहिनीमध्ये बसू शकतील किंवा आराम करू शकतील अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. मृतदेहाच्या बाजूला बसण्याची, प्रदक्षिणा घालता येईल अशी व्यवस्था आहे. शववाहिनी उभी केल्यानंतर गर्दी जास्त असेल तर बाहेरून देखील दोन्ही बाजूंनी मृतदेहाचे अंतिम दर्शन घेता येईल अशी ही व्यवस्था आहे. अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने ही शववाहिनी असल्यामुळे मृतदेहाची अवहेलना होण्याची शक्यता नाही.शववाहिनी चे फोटो