पालघर : आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसह प्राधान्यक्रम कुटुंबांना शासकीय रास्त धान्य दुकानांचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने गावातच रास्त धान्य दुकाने उपलब्ध करून दिली आहेत. मात्र पालघर तालुक्यातील वाडा खडकोनावासीयांना शासकीय रास्त धान्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असून त्यासाठी सुमारे पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.गावात आधी अस्तित्वात असलेल्या रास्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द झाल्यानंतर गावातील लाभार्थीना पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आवंढाणी गावात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. आवंढाणी गावातील परवानाधारक दुकानावर इतर दोन गावांच्या धान्यवाटपाचा परवाना असल्याने वाडा खडकोनावासीयांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे. वाडा खडकोना ग्रामपंचायत ही महामार्गालगत असून ती अनुसूचित क्षेत्रातील आहे. गावात आठ पाडे आहेत. सुमारे एक हजार दोनशे इतकी या गावाची लोकसंख्या आहे. गोरगरीब लाभार्थीना धान्य डोक्यावर घेऊन घरी येईपर्यंत दमछाक होताना दिसत आहे. वाडा खडकोना गावात धान्यवाटप सुरू करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.
वाडा खडकोना गावापासून आवंढाणी गावाचे अंतर मोठे असल्यामुळे ग्रामस्थांना दर महिन्याला पायी तसेच भाडे खर्च करून धान्य दुकान गाठून धान्य खरेदी करावे लागते. एका महिन्याच्या धान्य खरेदीसाठी दोन ते तीन चकरा माराव्या लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. धान्य खरेदीसाठी वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड पडत असल्याने पुरवठा विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
गावात रास्त धान्य दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला असल्याची माझी माहिती आहे. गावातील नागरिकांना उद्भवलेल्या अडचणी व इतर माहिती जाणून घेऊन त्यावर तोडगा निघण्याच्या दृष्टीने तातडीची कार्यवाही केली जाईल. -शामली धपाडे, तालुका पुरवठा अधिकारी,पालघर तालुका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा