|| कल्पेश भोईर
पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील साप पकडणे बंद
वसई: अग्निशमन दलाकडून वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागांत आढळून येणाऱ्या सापांना सुखरूप पकडून वनविभागात सोडले जात होते. मात्र साप जंगलात सोडण्यास वनविभागाकडून विरोध होत असल्याने आता पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील साप पकडणे बंद करण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होताच वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागांत मोठ्या प्रमाणात सापांचा शिरकाव होत असतो. शहरातील बहुतांश भागाला लागूनच नाले, जंगल परिसर गेला आहे. त्यामुळे कधी कधी साप हे आता थेट नागरी वस्तीत शिरतात.

तर काहींनी जंगल परिसराला लागूनच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे जंगलातील सापही नागरी वस्तीत येतात. विशेषकरून पावसाळ्यात जेव्हा पूरस्थितीची समस्या निर्माण होत असते तेव्हा अधिक प्रमाणात सापांचा वावर असतो. यात नाग, धामण, फोर्से, अजगर, मणेर, घोणस अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. जेव्हा साप घरात किंवा घराच्या अंगणात घुसतात तेव्हा त्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत असतात. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये व वन्यजीवालाही कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अग्निशमन दलाकडून  त्या सापांना पकडून त्यांना वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर येथील जंगलात सोडून सुखरूप सोडून दिले जात होते. परंतु आता अग्निशमन दलाकडून  शहरातील विविध ठिकाणच्या भागात आढळून येणाऱ्या सापांना पकडणे बंद करण्यात आले आहे.

कारण पकडण्यात आलेले साप जंगलात सोडण्यास वनविभागाकडून परवानगी दिली जात नसल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. जेव्हा साप पकडलेले साप जंगलात सोडण्यासाठी जातो अशा वेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे साप जंगलात सोडायचे नाहीत, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे हे पकडलेले साप सोडायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे आता शहरात आढळून येणारे साप न पकडण्याचा निर्णय अग्निशमन विभागाकडून घेण्यात आल्याचे अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे.

वसई-विरार शहरातील सर्वाधिक फोन हे जास्तकरून सापांना रेस्क्यू करण्यासाठीचे असतात. महिन्याला सरासरी ४०० ते ४५० इतके साप आढळून येतात. मागील दोन वर्षांत शहरात साप आढळून येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

यात २०२०-२१ मध्ये पालिकेच्या अग्निशमन विभागाने ४ हजार ८६३ इतक्या सापांना सुखरूप पकडून जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले होते. आता वनविभागाकडून साप जंगलात सोडण्यास विरोध होऊ लागल्याने अग्निशमन दलाने नागरी वस्तीच्या ठिकाणी आढळून येणारे साप पकडणे बंद केले आहे.

नागरिकांची चिंता वाढली

नागरी वस्तीत व घरात साप शिरतात तेव्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. अशा वेळी अग्निशमन दलाला पाचारण करून हे साप पकडले जात होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत होता. आता वसई-विरार अग्निशमन विभागाने साप पकडणे बंद केल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. साप घुसल्यास त्याला बाहेर काढणार कसा? तर दुसरीकडे सर्प दंश होण्याची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. दाटीवाटीच्या एखाद्या ठिकाणी साप गेल्यास त्यावर लक्ष ठेवणेसुद्धा कठीण जाऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे साप आल्यास पटकन कोणाची मदत घ्यायची अशा अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.