वाडा : जव्हार वन विभागाच्या कंचाड वन परिक्षेत्राच्या हद्दीत खैरांची तस्करी करणारा टेम्पो वन विभागाने पकडला असून यातील १५० नग खैर प्रजातीचे नऊ टन (१० लाख रुपये किमतीचे) लाकूड पकडलेल आहे. अवैद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे सह १८ लाखांचा मुद्दमाल हस्तगत केला आहे.बाजारामध्ये खैरांच्या झाडांना व प्रजातीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने खैर चोरट्यांचा परिसरात मोठा वावर आढळत आहे. जंगलामधून किंवा अन्य ठिकाणावरून खैरांची मोठी तस्करी करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर वन विभाग पहारा ठेवून आहे. मात्र तरीही खैर चोर (तस्कर) वन विभागाला हुलकावण्या देत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली परिसरातुन खैरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती जव्हार वन विभागाच्या कंचाड वन परिक्षेत्राला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने सापळा रचत २७ एप्रिलच्या पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास “कंचाड – कुर्झे – पाचमाड” मार्गावरील म्हसरोली परिसरात टेम्पो पकडला. हा टेम्पो पाचमाड कडून कंचाड मार्गे पडघा (भिवंडी) येथे जात असल्याची माहिती मिळाली आहे. टेम्पो चालकासह इतर जणांनी अंधाराचा फायदा घेत फरार झाले, तरी एक आरोपीला पकडण्यात घेण्यात वनविभागाला यश आले आहे. या पकडलेल्या टेम्पोमध्ये खैराचे १५० नगांपैकी १२० सोलिव खैराचे नग आढळून आले आहेत. त्यांचे वजन नऊ टन (९ घनमीटर) असुन एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल मोहिते यांनी दिली.
ही कारवाई जव्हार वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. सैपुन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कंचाड वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कंचाड वनपाल पी. टी. म्हसकर, उपराळे वनपाल जे.डी देशमुख, वनरक्षक एम.डी केदार, पी.एन. धानवा, एस. व्ही.आतकरी, रोहित सांबरे, अनिल भडांगे, वनमजूर रविंद्र पवार, प्रकाश रिंजड आकाश रिंजड यांच्या पथकाने हि विशेष मोहीम फत्ते केली आहे.
वन विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार
या खैरांची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो कुठून आला तपास सुरू असून तो पडघा (भिवंडी) येथे जात होता अशी माहिती सुरू असल्याने त्याबाबत तपास सुरू आहे. खैरांची अवैध चोरी व वाहतूक करणारी टोळी इतर बाहेरील व त्याला स्थानिक नागरिक सामील असुन जवळपास १० ते १५ जणांची सक्रिय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चोरट्या खैरमालाचा पंचनामा करण्यात आला आहे.
यापूर्वी १७ कारवायांमध्ये कोट्यवधी चा माल जप्त
यापूर्वी जव्हार वन विभागाने मुंबई, ठाणे सह वेगवेगळ्या भागात खैर तस्करांवर कारवाई केली आहे. वर्षभरात खैर तस्करांवर तब्बल १७ कारवाया करून कोट्यावधी रुपयांचा खैर मालाचा साठा जप्त करण्यात वन विभागाच्या मोहिमेला यश आले आहे.
कशा प्रकारे केली जाते खैराची चोरटी वाहतूक
खैर तस्कर हे ज्या ठिकाणाहून खैर तस्करी करायची आहे तेथील हे पहिल्यांदा रेकी करतात, खैरांची चोरटी वाहतूक करताना काही वेळ आधी जागोजागी खाजगी वाहन लपून छपून परिसरात गस्त घालतात.मध्यरात्री ते पहाटे दरम्यान चोरटी वाहतूक करण्याचे नियोजन करतात.ज्या मार्गावरून टेम्पोने चोरटी वाहतूक करायची आहे त्याच्या पुढे राहतात. म्हणजे वन विभागाला जरी माहिती मिळाली असली तरी खाजगी (कार) वाहनावर संशय येणार नाही. आणि टेम्पो पकडल्यास ते पळून जाण्यास यशस्वी होतात.अशा प्रकारे अनेक कारवाया होवून देखील खैर तस्कर हे सापडून येत नसुन ते मोकाटच राहतात.