७२ पदे रिक्त असल्याने शेतीसह महसुली कामांना विलंब

निखील मेस्त्री

पालघर : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयातून खरीप कर्जासाठी सातबारा व शेतीबाबतची तत्सम कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्य़ात तलाठी संवर्गाची बहुतांश पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांसह महसुली कामांना विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्य़ात तलाठी संवर्गातील ७२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाला अतिरिक्त ताण येत असून एका तलाठय़ावर कामाचा चौपट बोजा असल्याचे चित्र आहे.

स्थानिक पातळीवर कृषी, जमिनी संबंधाची सगळी कामे व कागदपत्रे ही तलाठी कार्यालयातून घेतली जातात. तलाठी सजा व महसुली गावांनुसार ही कार्यालये विविध ठिकाणी स्थापन केली असली तरी तलाठीअभावी ही कार्यालये ओस आहेत. सद्य:स्थितीत तलाठय़ांची बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे एका तलाठय़ावर तीन ते चार तलाठय़ांच्या कामाचा भार येऊन पडला आहे. यामुळे तलाठय़ावर कामाचा जितका डोंगर आहे, तितकेच नागरिकही आपली कामे होत नसल्यामुळे महसूल विभागाच्या नावाने बोटे मोडीत आहेत.

भौगोलिकदृष्टय़ा मोठे क्षेत्र असल्यामुळे एक तलाठी विविध क्षेत्रांत जाऊन कामे करू शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या कामांना विलंब होत आहे. या प्रकारामुळे काही ठिकाणी नागरिकांच्या आक्रोशालाही तलाठी वर्गाला समोर जायची पाळी अनेक वेळा ओढवली आहे, तर काही ठिकाणी आम्हाला तलाठी बदलून द्या असे ठरावच गावांनी घेतल्यामुळे तलाठी बदलून द्यायचा कुठून, असा प्रश्न तहसीलदारांना पडला आहे.

स्थानिक पातळीवर महसूल, कृषीसंबंधीची कागदपत्रे हे तलाठी कार्यालयातच उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक तलाठी कार्यालयात आपली कामे करण्यासाठी येत असतात. मात्र तलाठी नसल्याने नागरिकांना हताश होऊन माघारी फिरावे लागते किंवा एखाद्या कार्यालयात संबंधित तलाठी बसले असल्यास त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना आपले काम करून घ्यावे लागते. तलाठी संवर्गाची मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांसह तलाठय़ांचेही हाल होत आहे. त्यातच महिला तलाठी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका तलाठय़ावर तीन ते चार तलाठी  कार्यालयांचा (सजा) भार असल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांच्या आक्रोशसह कामाचा मोठा ताण पडत आहे.

पालघर जिल्ह्य़ात पालघर तालुका व डहाणू तालुका भौगोलिकदृष्टय़ा मोठा आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी सोळा तलाठय़ांची पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या विविध कामांसह नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे अशी विविध कामे तलाठी यांना करावे लागत आहेत. मात्र अतिरिक्त कामाचा तणाव असल्यामुळे अशा विविध कामांनाही बराच विलंब होत आहे.

ही सर्व पदे लवकरात लवकर भरली गेली तर कामाचा ताण कमी होईल व नागरिकांची कामेही वेळेत होतील. त्यामुळे तलाठी कार्यालयाचा कारभार सुरळीत चालेल असे सांगितले जात आहे. २०१३ पासून भरती नाही पालघर जिल्ह्यतील तलाठी भरती ही २०१३ पासून झालेलीच नाही. आरक्षणाबाबत या संवर्गाचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे इतर जिल्ह्य़ात भरती झाली व पालघर उपेक्षित राहिला. या प्रकरणात तोडगा निघावा यासाठी त्रयस्थ पक्षकार म्हणून आम्हाला या प्रकरणात सामावून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तलाठी संघाने केली होती.

पालघर जिल्ह्य़ातील तलाठी भरतीबाबतची माहिती नाही, मात्र ही बाब तपासून घेऊन भरतीसाठी प्रयत्न करू.

बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

महसूलमंत्री व मंत्रालय प्रशासनातील उच्चाधिकारी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे.

 

Story img Loader